अमरावती, दि. 23 : अपार्टमेंटमध्ये लागलेल्या आगीमध्ये सिलींडरचा स्फोट होण्यापासून रोखणाऱ्या आणि 70 कुटुंबाचे रक्षण करणाऱ्या करीना थापाचा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सत्कार केला. यावेळी करिना थापाला शिक्षण आणि खेळासाठी सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी दिले. तसेच तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. कटियार यांनी करिना आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. श्री. कटियार यांनी थापा कुटुंबियांची माहिती घेतली. करीना हिची शैक्षणिक माहिती तसेच खेळातील अभिरूचीबाबत माहिती घेतली. बॉक्सींग खेळात तिचे प्राविण्य असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तिला योग्य ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. करीनाने शिक्षण आणि खेळामध्ये मेहनत करावी, खेळामध्ये सुरवातीच्या काळात मदत मिळणे कठिण असते, त्यामुळे जिल्हा प्रशासनातर्फे तिला पूर्ण मदत करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी करिना हिचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच भेटवस्तूही दिल्या. करीनाच्या धाडसाची दखल घेत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी करीनाची निवड केली आहे. तिला राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात गुरूवार, दि. 26 डिसेंबर रोजी समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
00000
The post जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करीना थापाचा सत्कार first appeared on महासंवाद.