मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना राखी बांधत लाडक्या बहिणींकडून कृतज्ञता व्यक्त

सातारा दि.18 (जिमाका):  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का? या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थाला पैसे द्यायचे नाहीत.  हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत. तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींशी संवाद साधला.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उपस्थित भगिनींशी संवाद साधला.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या सन्मान सोहळ्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता.  दुपारी 12 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांतून महिला मोठ्या प्रमाणावर सैनिक स्कूलच्या मैदानाच्या दिशेने येत होत्या. यावेळी जवळपास 50 हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या आपल्या बहिणींशी मुख्यमंत्री संवाद साधत त्यांनी तुमच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का?,  या पैशाचा उपयोग कसा करणार आहात? असे प्रश्न विचारत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी उत्स्फूर्त संवाद साधला.

यावर अनेक महिलांनी शिलाई मशीन घेणार आहोत,  मुलांच्या शिक्षणासाठी पैसे वापरणार आहोत. आमच्या मुलांना शिकवून मोठे करणार आहोत, असे सांगून  कृतज्ञता व्यक्त केली.  लाडक्या बहिणींनी लाडके भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राख्या बांधून भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

यावेळी एका बहिणीने ज्या महिलांचे कधी खातेसुद्धा उघडले गेले नव्हते, अशा लाखो महिलांची खाती या योजनेमुळे बँकेत उघडली गेली आहेत, एवढेच नव्हे तर त्यांच्या खात्यावर पैसेही जमा झाले आहेत. याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांना सलाम करते अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी पन्नास हजारांच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या महिलांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मोबाईलचे टॉर्च दाखवून अभिवादन केले. याला तितक्याच उत्स्फूर्तपणे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रतिसाद दिला. आगमनप्रसंगी महिलांनी फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या भाऊरायांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या घरी परत जात असताना सुखरुप व सुरक्षित जा, आपल्या संपूर्ण परिवारासोबत राखी पौर्णिमा सण उत्साहात साजरा करा अशा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *