मुंबई, दि. १० : महिला व बालविकास विभागाच्या हडपसर येथील जागेवर महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेसाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘यशदा’ पुणेच्या धर्तीवर आधुनिक प्रशिक्षण संकुल उभारण्याच्या कार्यवाहीस गती देण्याचे निर्देश दिले.
महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्थेस जागा उपलब्ध करून देण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, संस्थेसाठी स्वतंत्र इमारत उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. या संस्थेमार्फत महिला व बालविकास विभागासह इतर विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत, प्रशासकीय तसेच तांत्रिक प्रशिक्षण देणे शक्य होणार आहे. तसेच मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पायाभूत, प्रेरक व उजळणी प्रशिक्षण अधिक प्रभावीपणे देता येईल.
बैठकीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस), एकात्मिक बाल संरक्षण योजना (आयसीपीएस) तसेच विभागाच्या इतर शाखांना केंद्र शासनाकडून प्रशिक्षणासाठी प्राप्त होणारा निधी संस्थेस उपलब्ध करून देणे, आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, रिक्त व कंत्राटी पदे भरणे, प्रशिक्षण आराखड्यास मंजुरी, लेखापरीक्षण व्यवस्था आणि विकास निधीचा परिणामकारक वापर यांसह विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस आयुक्त डॉ. जगदिश मिनियार, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, उपआयुक्त सुवर्णा पवार, अवर सचिव प्रसाद कुलकर्णी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००
श्रद्धा मेश्राम/विसंअ