खनिज व्यवस्थापनासाठी आधुनिक डिजिटल प्रणाली विकसित करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. ६ : राज्यातील खनिज व्यवस्थापन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि नवतंत्रज्ञानावर आधारित करण्यासाठी आधुनिक डिजिटल ‘मिनरल मॅनेजमेंट सिस्टीम’ विकसित करण्यात येत असून, या प्रणालीच्या माध्यमातून महसूलवाढीसह खनिज संपत्तीचे शाश्वत आणि परिणामकारक व्यवस्थापन सुनिश्चित करण्यात येईल, असे  खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

मंत्रालय येथे खनिकर्म विभागासाठी विकसित करण्यात येणाऱ्या आधुनिक डिजिटल ‘मिनरल मॅनेजमेंट सिस्टीम’ संदर्भातील सादरीकरणाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खनिकर्म विभागाचे सहसचिव लक्ष्मीकांत डोके, दूरदृश्य प्रणालीद्वारे भूविज्ञान व खाणकाम विभागाचे महासंचालक डॉ. टी. आर. के. राव तसेच विभागातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत राज्यातील खनिज व्यवस्थापन अधिक सक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या डिजिटल प्रणालीच्या विविध घटकांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खनिकर्म विभागाचा महसूल वाढविण्यासाठी या प्रणालीचा प्रभावी वापर, त्यामध्ये आवश्यक सुधारणा, अंमलबजावणीची कार्यपद्धती, विविध विभागांमधील समन्वय तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कामकाज अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.

राज्यातील खनिज संपत्तीचे शाश्वत, पारदर्शक आणि परिणामकारक व्यवस्थापन हे शासनाचे प्राधान्य असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच, ‘मिनरल मॅनेजमेंट सिस्टीम’च्या अंमलबजावणीसंदर्भातील अंतिम निर्णय खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर तसेच भूविज्ञान व खाणकाम विभागाशी सविस्तर चर्चा करून घेण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

0000

संध्या गरवारे/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *