आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अग्रस्थानी नेण्याचा निर्धार – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, दि. ६ : शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांत गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांप्रमाणे अत्याधुनिक सुविधा, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

मुंबईतील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या नूतनीकरण केलेल्या मध्यवर्ती सभागृहाचे, मुखरोग निदान व क्ष-किरण शास्त्र विभागाचे तसेच सेंट जॉर्ज रुग्णालयातील विविध अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.त्यावेळी मुश्रीफ बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी, संचालिका डॉ पल्लवी सापळे,शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. डिंपल पाडावे, सहसंचालक विवेक पाखमोडे,  वरिष्ठ अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई ही देशातील सर्वांत जुनी आणि प्रतिष्ठित दंत शिक्षण संस्था असून दंत शिक्षण, संशोधन आणि रुग्णसेवा या तिन्ही क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्य शासनाच्या सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून मध्यवर्ती सभागृहाचे अत्याधुनिक स्वरूपात श्रेणीवर्धन करण्यात आले आहे. या पूर्ण वातानुकूलित सभागृहात ४८० आसने, आधुनिक ध्वनी व ऑडिओ-व्हिज्युअल प्रणाली, उच्च दर्जाची प्रोजेक्शन व्यवस्था, व्यावसायिक प्रकाशयोजना, स्वतंत्र ग्रीन रूम आणि आधुनिक स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. हे सभागृह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सांस्कृतिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

जिल्हा नियोजन समितीच्या २ कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून मुखरोग निदान व क्ष-किरण शास्त्र विभागाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या विभागासाठी सुमारे ८४ लाख रुपयांचे अत्याधुनिक सीबीसीटी यंत्रही उपलब्ध आहे. त्यामुळे रुग्णांचे अधिक अचूक निदान होण्यासह विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल. सेंट जॉर्ज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या नव्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या वॉर्डमुळे माता व बाल आरोग्य सेवांना बळ मिळणार आहे. अत्याधुनिक हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी केंद्रामुळे गंभीर आजारांवरील उपचार अधिक प्रभावीपणे करता येतील.स्टेट बँक ऑफ इंडियाने सामाजिक उत्तरदायित्वातून उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक कार्डियाक ॲम्ब्युलन्समुळे आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. या सहकार्याबद्दल वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी बँकेचे आभार मानले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक वसतिगृहे, मल्टिमीडिया सुविधा, अभ्यासिका, परीक्षा हॉल, क्रीडा सुविधा, आधुनिक सभागृहे आणि जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा उभारण्याचे काम गेल्या अडीच वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉक्टर हा केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे मोठे माध्यम असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. भविष्यात खासगी वैद्यकीय व्यवसाय करतानाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांप्रती संवेदनशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. उत्तम डॉक्टर होण्याबरोबरच चांगला माणूस बनणेही तितकेच महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

00000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *