वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०२६ जाहीर

१८ शेतकरी व संस्थांचा होणार गौरव
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात १ जुलै रोजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

मुंबई, दि. २५ : वसंतराव नाईक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी राज्यातील विविध भागांतील १८ विजेत्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधान भवन येथील मंत्रालय विधिमंडळ पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. यंदाचा कार्यक्रम १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

प्रतिष्ठानच्या वतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, संशोधक आणि संस्थांचा गौरव करण्याची परंपरा सुरू आहे. आतापर्यंत ३०४ शेतकरी आणि ८५ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. तसेच राज्यभरात कृषीविषयक चर्चासत्रे, प्रशिक्षण शिबिरे आणि विविध जनजागृती उपक्रमही प्रतिष्ठानमार्फत राबविण्यात आले आहेत.

यावर्षी राज्यातील विविध भागांतील १८ विजेत्यांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. गडचिरोली, रत्नागिरी, धुळे, जळगाव यांसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी आणि संस्थांना या पुरस्कारांसाठी निवडण्यात आले आहे.

पुरस्कार विजेत्यांची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे –

सामाईक पुरस्कार – किसान मार्केट यार्ड- अध्यक्ष गिरीश अग्रवाल, शेलू ( बु), नांदेडरोड, जि . यवतमाळ., कृषी उल्लेखनीय योगदान पुरस्कार – डॉ. आदिनाथ चव्हाण, पुणे, कृषी साहित्य पुरस्कार – सतीश खाडे, पुणे.,  कृषी पत्रकारिता पुरस्कार- भिलाजी दिगंबर जिरे, मु. पो- कुडाशी, जि- धुळे., कृषी निर्यात पुरस्कार- राजे रावरंभा शेतकरी उत्पादक कंपनी, अध्यक्ष – विकास वीर, करमाळा कुर्डूवाडी रोड, जि- सोलापूर., फलोत्पादन पुरस्कार – राजेश श्रीविलास पटवर्धन, रत्नागिरी., भाजीपाला व रोपवाटिका संवर्धन पुरस्कार – वैभव उघडे, वर्धा., दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन पुरस्कार – गौ ॲग्रोटेक कोल्हापूर ऑर्डर फार्मर प्रोड्युसर कंपनी, अध्यक्ष – योगेश खराडे, शिंदेवाडी, जि- कोल्हापूर, जलसंधारण पुरस्कार – डॉ. सुमंत पांडे, बाणेर, पुणे., आधुनिक फुलशेती पुरस्कार – दादासाहेब दौलतराव शिंदे, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर, सामाजिक वनीकरण पुरस्कार – विशाल वसंतराव पाटील, सोयगाव, मालेगाव आणि संदीप मधुकर लोहारकर, संगमेश्वर, मालेगाव., महिला केंद्रित ग्रामविकास पुरस्कार – योगेश्वरी चौधरी, दाव्वा, जि- गोंदिया., पुनर्जीवित शेती पुरस्कार –सदाशिव वामनराव अडकिने, इंजनगाव पश्चिम, जि- हिंगोली., नाविन्यपूर्ण शेतकरी पुरस्कार- अमित बाजीराव पाटील, कोल्हापूर., कृषी प्रक्रिया पुरस्कार – सुश्रुत पाटील, मु. पो- वाणगाव, जि- पालघर, रेशीम उद्योग पुरस्कार – जीवन अशोक चिप्रीकर आणि अश्विनी चिप्रीकर, कवठेएकंद, जि- सांगली., जैवविविधता पुरस्कार – शंकर बाबा शिंदे (गिधाडबाबा) मु. पो – चिंचवडचा खोरीपाडा, जि- नाशिक., आधुनिक स्टार्टअप पुरस्कार –

प्रवीण मोगल आणि सचिन मोगल, निफाड, जि- नाशिक.

0000

गजानन पाटील/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *