मुंबई, दि. ११ : श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाची कामे प्रभावीपणे राबवून कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी सुरू असलेल्या कामांना गती देण्याचे निर्देश सूचना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. श्रीवर्धन येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यांतील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रस्तावामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रीटमेंट प्लांट, ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग, बायोगॅस प्रकल्प तसेच संरक्षण भिंत आदी आवश्यक बाबींचा समावेश करावा. शहराच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच रस्त्यालगत कचरा साचू नये, यासाठी प्रभावी नियोजन करण्यात यावे.
म्हसळा तालुक्यातील मेटकर्णी येथील सध्याची कचरा व्यवस्थापनाची जागा अपुरी पडत असल्याने उपलब्ध जागेचा विस्तार करून घनकचरा व्यवस्थापनाची सुविधा विकसित करण्याबाबत कार्यवाही करावी. शहराच्या हद्दवाढीच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील कचऱ्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन करावे, मेटकर्णी परिसरातील घनकचरा व्यवस्थापनाचा स्वतंत्र प्रस्ताव न करता तो संबंधित सामूहिक प्रस्तावात समाविष्ट करून उपलब्ध जागा, आवश्यक पायाभूत सुविधा आणि इतर बाबींची सविस्तर माहिती त्यामध्ये द्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. तळा येथील डम्पिंग ग्राउंडसंदर्भातील कामालाही गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपलब्ध जागा, आवश्यक पायाभूत सुविधा, संरक्षण भिंत तसेच कचरा वाहतुकीसाठी आवश्यक रस्ता यांचा समावेश करून सुसज्ज घनकचरा व्यवस्थापन करावे.
श्रीवर्धन येथील बहुउद्देशीय हॉलच्या कामाचाही मंत्री तटकरे यांनी आढावा घेतला. स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन या हॉलचा अधिक प्रभावीपणे वापर करता यावा, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. हॉलमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र सुविधा व जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या उपयोगासाठी आवश्यक उपकरणे, मशीन्स व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम करताना भविष्यातील विविध उपयोग लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधा, सुलभ प्रवेश व्यवस्था आणि विविध सामाजिक उपक्रमांसाठी आवश्यक जागेचे नियोजन करण्यात यावे. याच परिसरातील नगरपालिका शाळा तसेच इतर विकासकामांचाही आढावा घेऊन उपलब्ध जागा व पायाभूत सुविधांचा योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत नियोजन करावे, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.
श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा येथील घनकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव तातडीने अद्ययावत करून संबंधित यंत्रणांकडे सादर करावेत. स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींना प्रस्तावित सुविधांचा अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ