राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त २६ जूनला ‘जागर समतेचा’

मुंबई, दि. २५ : सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘जागर समतेचा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, २६ जून २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता राजर्षी शाहू सभागृह, छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर इमारत, दादर (प.), मुंबई येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात विष्णू शिंदे आणि सहकलाकार समता, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचा संदेश आपल्या प्रभावी कलासादरीकरणातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणार आहेत. राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थेचे प्रणेते होते. शिक्षण, आरक्षण, सामाजिक सुधारणा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले कार्य भारतीय समाजजीवनात अतुलनीय मानले जाते. त्यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘जागर समतेचा’ हा कार्यक्रम राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना आणि कार्याला कलात्मक अभिवादन करणारा उपक्रम आहे. लोककला, गीत, संगीत आणि प्रभावी सादरीकरणाच्या माध्यमातून समता, बंधुता, सामाजिक ऐक्य आणि मानवतेचा संदेश रसिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा देणारे आणि समतेच्या मूल्यांचा गौरव करणारे हे सादरीकरण प्रेक्षकांना राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा परिचय करून देईल. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्याचा हा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक प्रयत्न आहे.

हा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करणे, अभिजात कला, लोककला आणि थोर कलावंतांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. कला रसिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.

0000

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *