नाशिक, दि. १ मे (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यानिमित्त जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. ही सर्व कामे पुढील वर्षी मार्च पूर्वी पूर्णत्वास येतील, असा विश्वास जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजवंदन समारंभ आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), उपवनंसरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस आयुक्त अद्वैता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस दलाच्या तुकडीने संचलन केले. यावेळी विविध दलाच्या पथकांनी संचलनात सहभाग घेतला.
महाराष्ट्र राज्य अग्रेसर
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी व सर्वच थोर समाज सुधारकांनी घालून दिलेला विचारांचा वारसा राज्याने पुढे चालविला आहे. स्थापनेपासून ते आजपर्यंत महाराष्ट्र राज्याने प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्याचा ध्यास घेतला आहे. हा अग्रेसर राहण्याचा ध्यास देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांनी जोपासला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य हे प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे आणि राहील.
कामगार राज्याच्या प्रगतीचा कणा
कामगार हा राष्ट्राच्या, राज्याचा प्रगतीचा कणा आहे. शेतकरी, उद्योग कामगार, बांधकाम मजूर, सफाई कर्मचारी यांचे योगदान देखील तितकेच महत्वाचे आहे. “कष्टकरी हातांमुळेच महाराष्ट्र समृद्ध” झाला आहे. शासनाच्या वतीने कामगारांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सामाजिक सुरक्षा, आरोग्य, विमा, निवास योजना, असंघटित कामगारांसाठी विशेष उपक्रम राबविले जात आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद 31 ऑक्टोबर रोजी ध्वजारोहणाने होईल. त्यानंतर पुढील वर्षी कुंभमेळा आणि अमृत स्नान होईल. या पार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे देश- विदेशातून येणाऱ्या भाविकांना आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत.
उन्नत नाशिक अभियान
गोदावरी नदी बारमाही प्रवाही राहावी आणि निर्मळ आणि अविरत पाणी भाविकांना उपलब्ध व्हावे म्हणून विविध योजनांचा समावेश केला आहे. त्यामुळे पुढील वर्षी मार्च पूर्वी कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेली विविध विकास कामे पूर्णत्वास येतील. विकास कामे होत असताना शहरासह जिल्हाभरात नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होत आहे. मात्र, नाशिक शहर आणि जिल्ह्याच्या येणाऱ्या पुढील 25/30 वर्षाच्या नियोजनासाठी ही कामे तितकीच महत्त्वाची आहेत. ही सर्व कामे होत असताना “स्वच्छ, सुंदर व हरित नाशिक करण्यासाठी व देशात मॉडेल शहर म्हणून निर्माण करण्यासाठी “उन्नत नाशिक अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकसहभागाची चळवळ उभी राहत आहे. यामध्ये सर्वांचा सहभाग हा देखील तितकाच महत्वाचा आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा
गेल्या काही दिवसांपासून आपण सर्व जण तीव्र उन्हाचा सामना करीत आहोत. नाशिक सारख्या शहरात तापमानाने चाळीशी ओलांडली. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने उन्हापासून स्व- संरक्षणाची काळजी घ्यावी. त्यातही वृद्ध आणि बालकांची काळजी घेणे महत्वाचे आहे. घराबाहेर पडताना उन्हापासून संरक्षणाची पुरेशी साधने वापरावीत. भारतीय हवामान विभागाने संभाव्य एल निनोचा अंदाज व्यक्त केला आहे. याचा परिणाम येणा-या पावसावर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सात मोठे आणि १९ मध्यम प्रकल्प आहेत. त्यांच्यात ४१ टक्के जलसाठा आहे, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहात ५४ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे. पाण्याच्या बचतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती दल स्थापन करणे, वैरण विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत. पाण्याचे सुयोग्य नियोजन, जलसंधारणाच्या कामांना गती आणि जुन्या जलस्त्रोतांची दुरुस्ती व पुनरुज्जीवन यावर भर देण्यात येणार आहे.
कृषी विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना
जिल्हा प्रशासनाने आगामी खरीप हंगामाची पूर्व तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र सरासरी ६ लाख ४० हजार हेक्टर आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २२ हप्त्याचा ४ लाख २६ हजार ८९५ शेतकऱ्यांना ८५ कोटी १० लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यात मागील वर्षांत अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी आठ लाखावर शेतकरी खातेदारांना सहाशे आठ कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख २० हजार ४३७ शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय ॲप डाऊनलोड केले आहे. त्यात नाशिक जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अन्य खातेदार शेतकऱ्यांनी सुद्धा महाविस्तार एआय ॲप डाऊनलोड करून घ्यावे. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांची कोणतीही टंचाई जाणवणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. महाजन यांनी सांगितले.
डिजिटल प्रणालीमुळे प्रशासन गतिमान
मुख्यमंत्री महोदयांच्या दीडशे दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात नाशिक पोलिस आयुक्तालय, शबरी विकास महामंडळ आणि नाशिक जिल्हा परिषदेने उल्लेखनीय कामगिरी करीत प्रशासनात जिल्ह्याचा लौकीक वाढविला आहे. या माध्यमातून डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करून प्रशासन पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी होण्यास मदत होत आहे. गेल्याच महिन्यात केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित साधना सप्ताह २०२६ मध्ये राज्याने अव्वल क्रमांक पटकावला ही बाब राज्यासाठी अभिमानास्पद आहे.
माझं गाव- आरोग्य संपन्न गाव
“माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिवर्तन घडविणारे अभियान राबविण्यात येत आहे. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान केवळ एक योजना नसून, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी एक लोकचळवळ आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा त्यांच्या दारापर्यंत पोहोचवणे आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा प्रसार करणे. कारण आरोग्य ही केवळ वैयक्तिक बाब नसून ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” हे अभियानात ग्रामपंचायत, आशा व अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा. प्रत्येक गावाने आपली जबाबदारी ओळखून स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, नियमित तपासण्या करून घ्याव्यात, लसीकरण पूर्ण करावे आणि आरोग्यविषयक जनजागृतीमध्ये पुढाकार घ्यावा. राज्य शासनाने या अभियानासाठी विशेष प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना “आरोग्य संपन्न गाव” म्हणून गौरविण्यात येणार आहे. ही आपल्या प्रत्येक गावासाठी अभिमानाची आणि प्रगतीची मोठी संधी आहे.
विकसित महाराष्ट्रासाठी सहकार्य करा
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवायचा आहे. तेच स्वप्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिले आहे. त्यामुळे सन २०४७ पर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही मंत्री श्री. महाजन यांनी नमूद केले.
धनादेश प्रदान, गुणवंतांचा गौरव
यावेळी लान्स नायक संतोष वसंत खिरकाडे यांच्या शौर्यपूर्ण कामगिरी बद्दल पाच लाख रुपयांचा धनादेश, हतगड, ता. सुरगाणाचे ग्राम महसूल अधिकारी स्वप्नील छगन पालवी यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मंजुषा डहाळे, विद्या चिपळणूकर, शोभा पवार यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, प्रदान करण्यात आला, तर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षा रक्षक राजेंद्र भडांगे, संजय माधवराव बागूल, गजानन सुखदेव जाधव यांना विशेष कामगिरी बजावल्याबद्दल गौरविण्यात आले.
मान्यवरांची उपस्थिती
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, कुंदन हिरे, अभिजित नाईक, तहसीलदार पंकज पवार, अमोल निकम, प्रदीप वर्पे यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, नागरिक, विद्यार्थी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००