जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि. १ (जिमाका वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या वतीने १६ व्या जनगणनेचे काम सुरू आहे. आजपासून १५ मे पर्यंत स्व-गणनेचे काम सुरू झाले आहे. या जनगणनेत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आज सकाळी पोलिस कवायत मैदानावर ध्वजवंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात जनगणनेस मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, महापौर हिमगौरी आडके-आहेर, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. पवन दत्ता (इगतपुरी), उपवनंसरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी रोहितकुमार राजपूत, महानगरपालिकेचे उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार पंकज पवार आदी उपस्थित होते.

जनगणना ही देशातील सर्वांत मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया असून, या आकडेवारीच्या आधारेच केंद्र व राज्य सरकारांना विविध विकास योजना तयार करणे आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे शक्य होते. या जनगणनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमच डिजिटल माध्यमाचा वापर करून माहिती संकलित केली जाणार आहे.

या प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजे घरगणना (House Lasting), नागरिकांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी शासनाने स्वगणना (Self-Enumeration) ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्व- गणनेचा कालावधी १५ मे २०२६ पर्यंत राहील. नागरिक https://se.census.gov.in या लिंकवर जाऊन स्वतःच्या कुटुंबाची माहिती भरू शकतील. हे पोर्टल नागरिकांच्या सोयीसाठी मराठी, इंग्रजी, हिंदीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. जे नागरिक काही कारणास्तव स्व- गणना करू शकणार नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन माहिती संकलित केली जाईल. यासाठी नियुक्त प्रगणक आणि पर्यवेक्षक (Enumerators and Supervisors) यांचे प्रशिक्षण तालुका स्तरावर (Field Trainers) सुरू करण्यात आले आहे.

जनगणना हा अत्यंत महत्वाचा उपक्रम असल्याने प्रत्येक नागरिकाने स्वतः सह कुटुंबाची माहिती आजपासून १५ मे २०२६ पर्यंत प्राधान्याने (Self Enumeration) नोंदवावी. तसेच जे नागरिक स्व- गणना करणार नाहीत, त्यांच्याकडे १६ मे ते १४ जून २०२६ दरम्यान प्रत्यक्ष प्रगणनेसाठी येणाऱ्या प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक ती अचूक माहिती देऊन या राष्ट्रीय महत्त्वाच्या उपक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन मंत्री श्री. महाजन यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री महोदयांनी ‘मी जनगणनेत सहभागी होणार’, या सेल्फी पॉइंटवर सेल्फी ही घेतला.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *