बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक सहकार्य वाढविण्यास उत्सुक – अलियाक्सांड्र मात्सुकोऊ

मुंबई, दि. ३ : रशिया, युक्रेन व पोलंड हे शेजारी असलेला बेलारूस महाराष्ट्रासोबत प्रादेशिक स्तरावर सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक असून भारतासोबत डम्प ट्रक निर्यात, संरक्षण उत्पादन, शिक्षण, कृषी  व फलोत्पादन, वस्त्रोद्योग, पर्यटन, चित्रपट निर्मिती व संस्कृती यांसह इतर क्षेत्रात संबंध प्रस्थापित करण्याबाबत प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन बेलारूस प्रजासत्ताकाचे मुंबईतील वाणिज्यदूत अलियाक्सांड्र मात्सुकोऊ यांनी केले.

बेलारूसच्या वाणिज्यदूतांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

अनेक युरोपिअन संघ देशांचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर सध्या १ टक्क्यापेक्षा कमी आहे. मात्र अनेक निर्बंध असून देखील बेलारुसचा सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर ४ टक्के आहे तर भारताचा हा दर  ६.४ टक्के इतका आहे असे त्यांनी सांगितले.

बेलारूस औद्योगिक उत्पादनात आघाडीवर असून डम्प ट्रक निर्यात, संरक्षण सामग्री व मशिनरी उत्पादन उद्योगात पुढे असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्न प्रक्रिया, दूध व चीज उत्पादन क्षेत्रात देखील बेलारूस आघाडीवर असून या क्षेत्रात सहकार्य करार व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. खडक, दगड फोडण्याच्या मशीन उत्पादनात देखील बेलारूस आघाडीवर असून या मशिन्सचा उपयोग बांधकाम क्षेत्रात वाळू निर्मितीसाठी होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.

मुंबईच्या निम्म्याहून कमी लोकसंख्या असलेल्या बेलारूसमध्ये साक्षरता ९९ टक्क्यांहून अधिक आहे तसेच वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकी शिक्षणात बेलारूस प्रगत असून उच्च शिक्षण क्षेत्रात राज्याशी सहकार्य वाढविण्यास आपला देश उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.  बेलारूस येथे एक हजाराहून अधिक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय रिझर्व्ह बँक रशिया व बेलारूस येथे रुपयांमध्ये व्यापार सुकर करण्यासाठी विशेष खाते सुरु करण्याबाबत सहकार्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

बेलारूसच्या वाणिज्य दूतांचे स्वागत करताना महाराष्ट्र आणि बेलारूस प्रांतांमध्ये सहकार्य वाढविण्याबाबत संबंधितांशी चर्चा करू असे राज्यपालांनी सांगितले.  बेलारूसने मशिनरी निर्यात, फळे – भाज्यांची भारतातून आयात, शिक्षण या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी ठोस प्रस्ताव सादर करावे, असे राज्यपालांनी सांगितले.

बैठकीला बेलारुस वाणिज्य दुतावासाचे कौन्सल कॉन्स्टॅन्टीन पिन्चुक हे देखील उपस्थित होते.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *