ई मार्केटिंगद्वारे सांगलीतील शेतमाल देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल –  पालकमंत्री चंद्रकांत पाटील

फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे शंकानिरसन

हळद, बेदाणा, गूळ या तीन उत्पादनांची प्राथमिक निवड

सांगली, दि. २७ (जि. मा. का.) : सांगली जिल्ह्यातील कृषि क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी मित्रा कंपनी व सांगली जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतमालाच्या ई मार्केटिंगसाठी कार्यवाही सुरू आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील कृषि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून सांगलीतील शेतमाल थेट देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह खरेदीदार विक्रेता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित या मेळाव्यास जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार, आत्माचे प्रकल्प संचालक अभयकुमार चव्हाण, अपेडाचे अध्यक्ष डॉ. परशराम पाटील, फ्लिपकार्टचे अधिकारी आकाश मित्तल व अमित शिकरवार, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न वाढून तो श्रीमंत झाला पाहिजे. आपल्या गरजांसाठी त्याला इतरांवर अवलंबून राहण्याची तसेच, कर्ज घेण्याची वेळ येऊ नये, असा समृद्ध शेतकरी निर्माण झाला पाहिजे, या दृष्टीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे विशेष अभिनंदन करून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला तरच देश समृद्ध होईल. सांगली जिल्ह्यातील शेतकरी मेहनती आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कृषि उत्पादनांना बाजारपेठ मिळवून दिल्यास त्याच्या कष्टाला यश येईल. अशा शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा स्तरावर पूर्ण वेळ मार्गदर्शन केंद्र सुरू करावे, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

आपणही शेतकरी असून, मूळ गावी काजू प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच जोडधंदे व प्रक्रिया उद्योग सुरू करावेत. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. कृषि क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा. चांगल्या बाजारपेठेत उत्पादनांची विक्री केल्यास अधिक उत्पन्न मिळेल. त्यासाठी आवश्यक बाजारपेठ मिळण्यासाठी ई मार्केटिंगचा निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास करून त्यांनी कृषि विभागाचेही अभिनंदन केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, ई मार्केटिंगद्वारे कृषि उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने फ्लिपकार्ट या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मशी समन्वय साधून बेदाणा, हळद व गूळ या उत्पादनांचे नमुने गुणवत्ता तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ते यशस्वीरीत्या पात्र ठरले. दि. 26 मार्च रोजी फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा दौऱ्यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता तपासणी केली. भविष्यात या उपक्रमाचा विस्तार करून कृषि माल व प्रक्रियायुक्त उत्पादनांना ई मार्केटिंगद्वारे बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे नियोजन असून यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे ते म्हणाले.

प्रास्ताविकात विवेक कुंभार यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मसह खरेदीदार विक्रेता मेळाव्याची पार्श्वभूमी सांगून फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय दौऱ्यांतर्गत क्षेत्रभेटींची माहिती सांगितली. सांगली पॅटर्न अंतर्गत जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून गत वर्षी ऑगस्टमध्ये निर्यातभिमुख कार्यशाळा घेण्यात आली. दिवाळीदरम्यान दर्शन एक्‌सप्रेसने शेतमाल दिल्लीला पाठवण्यात आला. नोव्हेंबरमध्ये उत्पादक विक्रेते संमेलनचे आयोजन करण्यात आले. त्याचाच पुढचा भाग म्हणजे कृषि उत्पादनांना ई मार्केटिंगद्वारे जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रारंभी रोपट्यास जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या मेळाव्यास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच, जिल्ह्यातील विविध भागातून शेतकरी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान फ्लिपकार्टच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागातील वैशिष्ट्यपूर्ण शेतमाल व अन्य प्रक्रिया उत्पादनांचे प्रदर्शन कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आले. या प्रदर्शनास पालकमंत्री चंद्रकांत पाटील व अन्य मान्यवरांनी भेट दिली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *