मराठी साहित्य विश्वातील संवेदनशील शब्दसाधक हरपला – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. ६: ज्येष्ठ साहित्यिक ‘श्रीनिवास विनायक कुलकर्णी ऊर्फ ‘श्रीवि’ यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वाने एक संवेदनशील, अभ्यासू शब्दसाधक गमावला आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शोकसंदेशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात की, ग्रामीण मातीत रुजलेली संवेदनशीलता, निसर्गाविषयीची आत्मीयता आणि सामान्य माणसाच्या भावविश्वाचा वेध घेणारी विलक्षण लेखनशैली ही ‘श्रीवि’ यांच्या साहित्याची खरी ओळख होती. औदुंबरच्या भूमीशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यांच्या लेखणीतून कायम जिवंत राहिले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून मराठी भाषेचे सौंदर्य आणि जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी वाचकांना अनुभवायला मिळाली. ‘मौज’सारख्या प्रतिष्ठित नियतकालिकाचे संपादक म्हणून त्यांनी मराठी साहित्याला नवे लेखक, नवे विचार आणि नवे साहित्यिक प्रवाह दिले. अनेक नवोदित लेखकांना त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन दिले.

श्रीनिवास कुलकर्णी यांचे साहित्य हे पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्यविश्वाने एक मार्गदर्शक, संपादक आणि सर्जनशील विचारवंत गमावला आहे असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणतात.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *