पुणे, दि.२६- राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एरंडवणे येथील पूरग्रस्त भागाला भेट देवून येथील नागरिकांशी संवाद साधला. पुरामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आवश्यक सर्व मदत करण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पुणे महानगरपालिका उपायुक्त संजय शिंदे, सहाय्यक आयुक्त विजय नायकल, डॉ. संदीप बुटाला, पुनीत जोशी आदी उपस्थित होते.
मंत्री श्री.पाटील यांनी रजपूत विटभट्टी, कोथरूड येथील शाहू वसाहत, एरंडवणे येथील प्रतिज्ञा मंगल कार्यालय आणि कर्वे नगर येथील स्पेन्सर चौक भागाला भेट दिली. पूराचे पाणी शिरलेल्या घरांची पाहणी करून त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. पुण्यात बुधवारी मध्यरात्रीपासून झालेला पाऊस हा असाधारण होता. मध्यरात्रीनंतर झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे लागले, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. कोथरुडमधील पूरग्रस्त नागरिकांना जेवण- नाश्त्याची सर्व व्यवस्था करण्यात आली, तसेच रात्री ब्लँकेटदेखील देण्यात आले. पुरामुळे घरांच्या झालेल्या नुकसानाची माहिती घेवून प्रशासनाच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून मदत केली जाईल, अशा शब्दात त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश श्री.पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही ते म्हणाले.