योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन  पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून द्या – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर दि. १९: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’, मु’ख्यमंत्री अन्नपुर्णा योजना’, ‘मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना’, ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना’, ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना’ व ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ आदींसह विविध योजनांचा विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज आढावा घेतला. केंद्र व राज्य शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची संबंधित शासकीय विभागांनी प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना विहित वेळेत लाभ मिळवून द्यावेत, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त यांनी विविध योजनांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त जगदिश मिनीयार, नयना बोंदांर्डे, अनंत गव्हाणे, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त  गणेश पुंगळे, मनपाचे सह आयुक्त देविदास टकाळे, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक उमेश नागदेवे,  महिला व बालविकास विभागाच्या डॉ. सीमा जगताप यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

विभागीय आयुक्त दिलीप गावडे म्हणाले, केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी  जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक योजनेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची स्वतंत्र नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करावी. नोडल अधिकाऱ्यांनी योजनेबाबत संपूर्ण समन्वयाचे कामकाज करावे. योजना राबविणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून योजनेबाबत वेळोवेळी माहीती प्राप्त करून घ्यावी. योजना अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचारी यांच्या अडचणी सोडविण्यासाठी समन्वयाचे काम करावे. नोडल अधिकाऱ्यांप्रमाणेच अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देवून योजनेची तत्परतेने अंमलबजावणी करावी. जुलैअखेर सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या याद्या तयार करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचला पाहीजे, असे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता सुलभतेने होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, अशा सूचना देत विभागीय आयुक्त श्री. गावडे म्हणाले, योजनेसाठी कोणत्याही कर्मचाऱ्यांने अडवणूक करू नये अथवा पैश्यांची मागणी करू नये. असे आढळल्यास प्रशासकीय कार्यवाहीसोबतच गुन्हे दाखल करण्यासारख्या कठोर कारवाई करा. योजनांसाठी अधिकृत शासकीय केंद्राद्वारे प्राप्त होणारे अर्ज अधिकृत समजण्यात यावेत तसेच अनधिकृतपणे अर्ज गोळा करणे व मंजूर करण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक होवू नये, याची संपूर्ण खबरदारी घेण्यात यावी. योजनेचे अर्ज भरून घेतांना आधार क्रमांक व बँक खाते क्रमांक अचूक टाकल्याची तसेच सदर खाते लाभार्थीच्या नावाचेच असल्याची खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्हयातील विविध आस्थापना, उद्योजक, सेवा पुरवठादारांची बैठक घेवून मनुष्यबळ आवश्यकतेची मागणी घ्यावी तसेच, बारावी पास, पदवीकाधारक, पदवी व पदवीत्तर उमेदवारांची यादी तयार करून पोर्टलवर नोंदणी करून घ्यावी. जिल्हानिहाय कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व जिल्हा उद्योजकता विकास विभागाचे अधिकारी यांची याकामी मदत घ्यावी.  जिल्ह्याच्या 2011 च्या लोकसंख्येनुसार प्रती 10 लक्ष लोकसंख्येसाठी 10 हजार युवा प्रशिक्षण उमेदवारांची मागणी घेण्याचे उदिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार आपल्या जिल्ह्याचे उदिष्ट निश्चित करुन त्यानुसार काम करावे, असे निर्देश श्री. गावडे यांनी यंत्रणेला दिले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेण्यासाठी नागरी भागात वार्डनिहाय व ग्रामीण भागात सेवाकेंद्रनिहाय कक्ष स्थापन करण्यासोबत नागरी भागात प्राप्त अर्जाची संख्या आढाव्यामध्ये तुलनेने कमी आढळून आली आहे. त्यामुळे, नागरी भागाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने प्राप्त अर्जाची छाननी करून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या तात्काळ तयार कराव्यात. जिल्हास्तरीय समित्यांनी लाभ

मंजूरीची कार्यवाही तातडीने सुरू करावी,15 ऑगस्टपुर्वी लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहीजे तसेच ऑफलाईन अर्ज ऑनलाईन करा, अशा सूचना श्री. गावडे यांनी दिल्या.

मनपा आयुक्त यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात सर्व शासकीय कार्यालय, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, पेट्रोलपंप, शासकीय रुग्णालये व अन्य गर्दीच्या ठिकाणी प्रचार प्रसीध्दीची कार्यवाही व मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनांसाठी शासन निर्णय तात्काळ काढला जाणार असून लाभार्थ्यांनी गॅस वितरकाकडे केवायसी करणे आवश्यक आहे. विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे.

मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज प्राप्त करून घेण्याची कार्यवाही करावी. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेचा शासन निर्णय लवकरच येणार असून मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करून घेवून छाननी करून सादर करा. असे निर्देशही श्री गावडे यांनी यंत्रणेला दिले.

यावेळी विविध विभागाचे विभागीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

०००

शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी  नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

छत्रपती संभाजीनगर, दि.१९, (विमाका) : महाराष्ट्र शासनाने मागील काही काळात अनेक महत्त्वपूर्ण योजना घोषित केल्या असून अशा योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा नियमितपणे घेणे सुरू आहे. योजनांची विभागातील सर्व जिल्ह्यांची आकडेवारी संकलित करणे, योजनांचे कार्यान्वयीन विभागाचे विभागस्तरीय अधिकारी व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्यासोबत समन्वय साधण्यासाठी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पुढीलप्रमाणे नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी उपायुक्त (आस्थापना) सुरेश बेदमुथा, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या दोन योजनांसाठी उपायुक्त (रो.ह.यो/पुरवठा) अनंत गव्हाणे, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी उपायुक्त (सा.प्र.) जगदिश मिनियार, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी उपायुक्त (महसूल) नयना बोंदार्डे या अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *