अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवा हवामान खात्याकडून प्राप्त इशारे नागरिकांपर्यंत पोहोचवा

 अमरावती, दि. 17 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत पोहोचण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते-पुल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांनी आज येथे दिले.

मान्सून पूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. निधि पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली आज विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून  दूरदृष्य  प्रणालीव्दारे उपस्थित होते. तर उपायुक्त  संजय पवार, गजेंद्र बावणे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्यासह दूरसंचार विभाग, भूजल सर्वक्षण यंत्रणा, महावितरण, जलसंपदा या विभागाचे प्रादेशिक प्रमुख, प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

विभागीय आयुक्त श्रीमती पाण्डेय म्हणाल्या की, आगामी पावसाळ्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मान्सून पूर्वतयारी आपापल्या जिल्ह्यात करुन ठेवावी. पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी व पुरामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा, धान्य पुरवठा करण्यासाठी नियोजन करावे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलू नयेत यासाठी जलस्त्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पाऊस वादळ प्रसंगी वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्व नियोजन करुन जलद सेवा पुरवावी. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पाचे स्ट्रक्चर सुस्थितीत असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी. विजेला अटकाव करणारी यंत्र सुस्थितीत असावी. नादुरुस्त स्थितीत असलेली वीज अटकाव यंत्र तात्काळ दुरुस्त करून घ्यावीत. आपात परिस्थितीसाठी सर्व विभागाने समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे निर्देश दिले.

त्या पुढे म्हणाल्या की, नदी खोलीकरण व पुर संरक्षण भिंतीची तपासणी व आवश्यकतेनुरुप दुरुस्त्या आताच करुन घ्याव्यात. शहरातील नाल्यांचे सफाई आदी कामे तातडीने पूर्ण करावी. जीर्ण व शिकस्त असलेल्या इमारती, पूलांचे सर्वेक्षण करून सुरक्षिततेबाबत खातरजमा करावी. नदीकाठावरील गावांत धोकादायक ठिकाणी (ब्लू लाईन, रेड लाईन) सीमांकन करावे, तसेच पूर प्रतिबंधक समिती स्थापन करावी. वारंवार आपत्तीची घटना घडणाऱ्या ठिकाणी सूचनाफलक लावावेत. आवश्यक तिथे निवारा कक्ष उभारावेत. धरणातील पाणी सोडताना पोलीस, कंट्रोलरूम व संबंधिताना 24 तास आधी कळवावे. सर्व प्रकल्पाची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी. ‘एसडीआरएफ’ तसेच ‘एनडीआरएफ’ची बचाव पथके स्थापन करुन आवश्यक साहित्यानिशी सुसज्ज ठेवावी. बचाव पथकांचे प्रशिक्षण व मॉकड्रीलही जिल्हा प्रशासनाने घ्याव्यात. बिनतारी यंत्रणा कार्यान्वित  करुन हवामान खात्याकडून इशारे प्राप्त होताच सर्वदूर माहिती जलद गतीने पोहोचवावी, असेही निर्देश डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील संभाव्य पूरबाधित तसेच दुर्गम गावे, बचाव पथकांसाठी मोटर बोट, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग्ज, रोप बंडल, सर्च लाईट, मेगा फोन, ग्लोव्हज, रेनकोट, स्कूबा डायव्हिंग कीट, हेल्मेट आदी विविध साधने, बचाव पथकांची मॉक ड्रिल, संरक्षित निवारा व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, वीज पुरवठा, नियंत्रण कक्ष, विजेचे संकेत देणारे दामिनी ॲप, नदी-नाल्यांची सफाई व खोलीकरण आदी बाबीं संदर्भात पूर्वतयारी संबंधित जिल्हाप्रमुखांनी आताच करुन घ्यावी तसेच वेळोवेळी यासंदर्भात आढावा घ्यावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय यांनी यावेळी दिल्या.

                                                                         00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *