दिव्यांग मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम

मुंबई, दि. २९ :- भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची माहिती दिव्यांग मतदारांपर्यंत पोहोचवण्याकरिता व मतदानाबाबत जनजागृतीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी कार्यरत शासन मान्यताप्राप्त दिव्यांग शाळांतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-दक्षिण मध्य मुंबई’ व ‘३१-मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २० मे, २०२४ रोजी सकाळी ०७ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत दिव्यांग मतदारांसाठी शाळांतर्फे राबविण्यात आलेल्या उपक्रमात मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी, पालक यांच्यासमवेत मेळावे, बैठका, चर्चासत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे मतदान जागृतीसाठी प्रभात फेऱ्या काढण्यात आल्या. प्रभात फेऱ्यांद्वारे दिव्यांग मतदारांनी मतदानाच्या दिवशी १०० टक्के मतदान करण्याबाबतचे आवाहन विद्यार्थ्यांतर्फे करण्यात आले. या उपक्रमामध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील माहिम येथील शिवाजी पार्क लायन्स डेफ स्कूल, दादर येथील श्रीमती कमला मेहता अंधशाळा, माटुंगा येथील मीरा विद्यालय विशेष मुलांची शाळा, शिवडी येथील जय वकील ऑटिझम सेंटर, माहीम येथील लायन्स स्कूल फॉर डेफ, सीपी टॅंक येथील ए.के. मुन्शी योजना स्कूल, नॅब वर्कशॉप फॉर ब्लाइंड या दिव्यांगासाठी कार्यरत शाळा व संस्था सहभागी झाल्या.

दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग व्यक्तींची गृह भेट घेऊन त्यांना मतदानाच्यादिवशी व्हीलचेअर, मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहन सुविधा उपलब्धतेबाबत माहिती दिली. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यक असलेले साधन उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानुसार प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी संबंधित दिव्यांग मतदाराला आवश्यकतेनुसार मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्यासाठी वाहन सुविधा (रिक्षा, टॅक्सी तसेच व्हीलचेअर युक्त वाहने) उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मतदानाकरिता दिव्यांग मतदारांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प, स्वच्छतागृहे, व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अंध मतदारांना मतदान केंद्रावर ब्रेल लिपीमध्ये बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर दिव्यांगांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असणार आहेत. ४० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांगत्व असलेले मतदार व वय वर्षे ८५ व अधिक वयोमान असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल बॅलेट म्हणजे घरी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून दिव्यांगांना उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधेची माहिती देण्यासाठी कर्णबधिर प्रवर्गाच्या शाळांनी सांकेतिक भाषेमध्ये रिल्स बनवून समाज माध्यमांद्वारे जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे, असे सुनीता मते, जिल्हा समन्वय अधिकारी दिव्यांग सुगम्यता, मुंबई शहर यांनी सांगितले.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *