बोरिवलीमध्ये दिव्यांगांना मिळाली सुविधा ॲप आणि मतदान केंद्रांवरील सुविधांची माहिती

मुंबई उपनगर, दिनांक २७: 152 बोरीवली विधानसभा मतदार संघाच्यावतीने दिव्यांग मतदारांसाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 प्रवेश योग्य आणि सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने त्यांना सक्षम ॲप तसेच मतदान केंद्रावर त्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या इतर सोयीसुविधांची माहिती देण्यात आली.

या मेळाव्याला उपस्थित दिव्यांग मतदारांना सहायक निवडणुक निर्णय अधिकारी शिल्पा करमरकर यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी इरेश चप्पलवार,  स्वीप नोडल अधिकारी रविंद्र बोदडे, दिव्यांग सहाय्यता कक्षाचे किरण साबळे,  दिव्यांग समन्वय अधिकारी कृतिका गंधारे उपस्थित होते.

मुंबई उपनगर जिल्ह्यात दिव्यांग मतदारांचा मतदानाचा टक्का वाढावा यासाठी लोकसभेच्या चारही मतदारसंघातील दिव्यांगांचे प्रबोधन आणि मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आणि २६- मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पंकज देवरे यांच्या यांच्या मार्गदर्शननाखाली मेळावा आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बोरिवली येथे दिव्यांग मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रे ही तळमजल्यावर उभारण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या मार्गावर दिव्यांगांसाठी दिशादर्शक असणार आहेत.

ज्या मतदारांना व्हील चेअरची सुविधा हवी आहे, तसेच ज्या ज्येष्ठ नागरिकांना आणि दिव्यांगांना घरापासून ते मतदान केद्रांपर्यंत वाहनाची सुविधा तसेच सहायकाची गरज असेल अशा मतदारांनी पूर्व सूचना देणे गरजेचे आहे. त्यासाठी सक्षम ॲपवर ऑनलाईन पद्धतीनेही पूर्वसूचना स्वीकारण्यात येत आहेत. याची माहितीही यावेळी श्रीमती करमरकर यांनी दिली.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *