सर्व शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी उत्तम समन्वय साधून लोकसभा निवडणूका शांततेत पार पडतील या दृष्टीने काम करावे – केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक

ठाणे,दि.२७ (जिमाका) : देशात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून शेवटच्या पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या २० मे २०२४ रोजी होत आहेत. ठाणे जिल्ह्यातील २३-भिवंडी , २४-कल्याण , २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकाऱ्यांनी गांभीर्याने काम करावे, सर्व शासकीय यंत्रणांनी आपापसात उत्तम समन्वय साधावा, असे निर्देश ठाण्यात दाखल झालेल्या केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षकांनी आज बैठकीत दिले.
        जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक  अधिकारी श्री. अशोक  शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती सभागृह, नियोजन भवन येथे निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस 23 भिवंडी मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चित्तरंजन मांझी, 24 कल्याण मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल, 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक श्री. चंद्र प्रकाश मीना व श्री.राहील गुप्ता उपस्थित होते. तसेच पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) डॉ. धोंडोपंत स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी २३-भिवंडी संजय जाधव, २४-कल्याण सुषमा सातपुते, २५-ठाणे मनिषा जायभाये, नोडल अधिकारी कायदा व सुव्यवस्था दीपक क्षीरसागर, नोडल अधिकारी आदर्श आचारसंहिता विजयसिंह देशमुख तसेच आयकर विभाग,  पोलीस विभाग- ठाणे नवी मुंबई, मिरा-भाईंदर, वसई विरार आयुक्तालय, केंद्रीय वस्तू व सेवाकर, महसूल, गुप्तचर संचालनालय, सीमा शुल्क व केंद्रीय उत्पादन शुल्क, अंमली पदार्थ नियंत्रक ब्युरो, अंमलबजावणी संचालनालय, राज्य उत्पादन शुल्क, वस्तू व सेवाकर, राज्य परिवहन विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र, अग्रणी बँक ठाणे, खर्च संनियंत्रण समिती २३-भिवंडी, २४-कल्याण , २५-ठाणे आदी सर्व विभागांचे जिल्हा समन्वय अधिकारी उपस्थित होते.
       यावेळी उपस्थित सर्व  विभागांच्या जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा चारही निरीक्षकांनी घेतला. लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत कशा प्रकारे कारवाई करण्यात आली याबाबतची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले. तसेच मुंबईची जीवनवाहिनी ही लोकल सेवा असून ठाणे, कल्याण, उल्हासनगर या परिसरात अनेक रेल्वे स्टेशन्स आहेत या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कॅशची ने-आण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे नमूद करीत रेल्वे स्टेशनवर पोलीस विभागाच्या माध्यमातून आरपीएफची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी या बैठकीत दिल्या.  मतदानाचे शेवटचे चार दिवस हे  अतिशय महत्वाचे असून या दिवसांत आरपीएफची कुमक वाढवावी, असेही त्यांनी नमूद केले.
     १३७ भिवंडी, १४६ ओवळा, १५० ऐरोली हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सर्व विभागांचे अधिकारी हे आपापले काम करीत असताना जर एखादी बाब आपल्या अखत्यारित नसेल पण जर त्या ठिकाणी काही आढळून आल्यास ते संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तातडीने कळविण्यात यावे. आपण सर्वजण करीत असलेले निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकांने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले.
     बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्व खर्च निरीक्षकांचे स्वागत केले. प्रास्ताविक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे यांनी केले. सूत्रसंचलन मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरडकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी एकत्रित मीडिया कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण नोडल अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी उपस्थित केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपस्थित नोडल अधिकाऱ्यांचे आभार मानले.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *