८५ वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना आता गृह मतदानाची सोय

चंद्रपूर दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

85 वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

 85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार : 13- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 16621 मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 7117 तर स्त्री मतदारांची संख्या 9504 आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात असे एकूण मतदार 2754 (पुरुष – 1163, स्त्री – 1591), चंद्रपूर मतदार संघात 2380 (पुरुष – 1100, स्त्री – 1280),  बल्लारपूर मतदार संघात 2246 (पुरुष – 892, स्त्री – 1354), वरोरा मतदार संघात 2878 (पुरुष – 1356, स्त्री – 1522), वणी मतदार संघात 2846 (पुरुष – 1225, स्त्री – 1621, आणि आर्णी विधानसभा मतदार संघात 3517 (पुरुष – 1381, स्त्री – 2136) मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 85 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 2403 (पुरुष – 921, स्त्री – 1482) आणि चिमूर मतदार संघात 2594 (पुरुष – 996, स्त्री – 1598) मतदार आहेत.

असे आहेत दिव्यांग मतदार : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 9679 आहे. यात 6164 पुरुष तर 3515 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी राजुरा मतदार संघात 1233 दिव्यांग मतदार (पुरुष – 781, स्त्री – 452), चंद्रपूर मतदार संघात 913 दिव्यांग मतदार (पुरुष – 591, स्त्री – 322), बल्लारपूर मतदार संघात 1842 दिव्यांग मतदार (पुरुष – 1195, स्त्री – 647), वरोरा मतदार संघात 1551 दिव्यांग मतदार (पुरुष – 1021, स्त्री – 530), वणी मतदार संघात 1679 दिव्यांग मतदार (पुरुष – 1035, स्त्री – 644), आर्णी मतदार संघात 2461 दिव्यांग मतदार (पुरुष – 1541, स्त्री – 920) आहेत.

तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची संख्या 1138 (पुरुष – 774, स्त्री – 364) आणि चिमूर मतदार संघात 1096 (पुरुष – 681, स्त्री – 415) मतदार आहेत.

०००००

नागरिकांना पाहता येईल उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र

नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईन पाहण्याची सोय उपलब्ध

चंद्रपूर दि. 20 : 13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उमेदवारांकडून दाखल करण्यात येणारे नामनिर्देशन पत्र व त्यासोबतचे शपथपत्र नमुना – 26, नागरिकांना विविध कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच ऑनलाईनसुध्दा पाहता येणार आहे.

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र व शपथपत्र नमुना – 26, नागरिकांच्या अवलोकनार्थ चंद्रपूर लोकसभा मतदार संघात समाविष्ट जिल्हा परिषद कार्यालय, महानगरपालिका, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायत आणि ग्रामपंचायत कार्यालयांचे नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. तसेच भारत निवडणुक आयोगाच्या https://affidavit.eci.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा शपथपत्र नमुना- 26 अपलोड करण्यात येणार असल्यामुळे या संकेतस्थळावर देखील नागरिकांना शपथपत्र नमुना- 26 पाहता येईल.

13 – चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुकीकरीता नामनिर्देशन पत्रे दिनांक 20 मार्च 2024 सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) निवडणूक निर्णय अधिकारी, 13-चंद्रपूर लोकसभा मतदार संघ तथा जिल्हाधिकारी, चंद्रपूर किंवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, चंद्रपूर यांचेकडे दिनांक 27 मार्च 2024 पर्यंत कोणत्याही दिवशी (सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे कार्यालयातील कक्षामध्ये दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रे वरील ठिकाणी कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक 28 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या (विस कलमी सभागृह) येथे सुरु करण्यात येईल.

ज्या उमेदवारांना उमेदवारी मागे घ्यावयाची असेल त्यांचे अर्ज 30 मार्च 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उपरोक्त अधिकाऱ्यांच्या कार्यालयात स्विकारण्यात येतील. चंद्रपूर लोकसभा मतदार संघात मतदान 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे.

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *