दिवेआगर येथे विस्तारित सुपारी संशोधन केंद्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

रायगड (जिमाका) दि-10:-  डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सुरू असलेले श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्र येथील अपुऱ्या क्षेत्रामुळे दिवेआगर येथील 2 हेक्टर क्षेत्रावर विस्तारित संशोधन केंद्र होत असून 5 कोटी निधी उपलब्ध आलेल्या या सुपारी केंद्राचे भूमिपूजन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते  संपन्न झाले.

यावेळी खासदार सुनिल तटकरे, महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे, माजी सरपंच उदय बापट, माजी सभापती लाला जोशी, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शिणगारे, कुलसचिव डॉ. प्रदीप हळदवणेकर, विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी, सांषधन उपसंचालक डॉ.अरुण माने, डॉ राजेश धोपावकर, प्रभारी अधिकारी संशोधन केंद्र डॉ सिद्धेश्वर सावंत, तांत्रिक सल्लागार डॉ.किरण माळशे, उपअभियंता राहुल घाडगे, उपसरपंच वसीम फकजी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कृषिमंत्री धंनजय मुंडे म्हणाले की, सुपारी या फळाला आपल्या जीवनात वेगवेगळ्या स्वरूपात महत्व आहे. श्रीवर्धनच्या सुपारीला तसेच रोहाच्या वाल यांना भौगोलिक मानांकन देण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, भाताची शेती करीत असलेल्या शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाही, यामध्ये कोकणातील शेतकरी अतिशय समाधानाने शेती करीत समृद्ध होत आहे. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठाचे आंतराराष्ट्रीय कंपन्या सोबत करारबद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आताच्या काळात कृषी विभागाने मोठी क्रांती केली असून महाराष्ट्रातील सर्वात सामान्य शेतकऱ्याची सुद्धा आर्थिक उन्नती होईल असेही कृषिमंत्री मुंडे म्हणाले.

रायगड जिल्ह्यामधील श्रीवर्धन दिवेआगर येथील जमीन व हवामानामध्ये सुपारीची पीक उत्कृष्ट प्रकारे येत असून सुपारीची प्रत सुद्धा चांगली असते दिवेआगर येथील मागणी केलेल्या नवीन जागेमध्ये सध्या सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन येथे राबविण्यात येत असलेले प्रयोग अधिक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येतील, त्यायोगे त्याचा शेतकरी वर्गास फायदा होऊन त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.  श्रीवर्धन सुपारी संशोधन केंद्राच्या स्थापनेपासून या संशोधन केंद्राचे एकूण क्षेत्र हे अत्यंत अल्प म्हणजे एक एकर होते त्यावेळी मिळालेल्या या जागेमध्ये आता पर्यंत हे संशोधन केंद्र सुरू आहे येथील  जागा सुपारी पिकावरील संशोधनासाठी अत्यंत अपुरी पडत असल्याने पुढील संशोधनासाठी सुपारी संशोधन केंद्रास आणखी क्षेत्राची आवश्यकता होती. या संशोधन केंद्राच्या जवळ दिवेआगर येथे पाच एकर क्षेत्र शासनामार्फत विद्यापीठाला हस्तांतरित करणे बाबत प्रस्तावित करण्यात आले होते, त्या अनुषंगाने दोन हेक्टर जमीन संशोधन केंद्रात घेण्यात आली.

खासदार सुनील तटकरे म्हणाले की, कृषिमंत्री धनंजय मुंडे आपल्या कारकीर्दीमध्ये दिवेआगर येथे होत असलेले सुपारी संशोधन केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे हे आमचे स्वप्न आहे.

यावेळी आपल्या मनोगतामध्ये महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, सुपारी संशोधन केंद्राचा पर्यटनाच्या वाढीसाठी देखील फायदा होईल.  तर महिलांसाठी शेती उद्योगासाठी विशेष उपक्रम राबवावे जेणेकरून महिलांना शेती व्यवसायाकडे वळविता येईल व त्यातून महिला सक्षमीकरणाला हातभार लागेल असेही त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसंतराव नाईक कृषिभूषण देऊन शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *