सांगली दि. ८ (जिमाका) : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम लोकाभिमुख असून सर्वसामान्य माणसांच्या जीवनात बदल घडविणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. हे सरकार गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे असून त्यांना न्याय देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ च्या माध्यमातून थेट योजनाच लाभार्थ्यांपर्यंत आणण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर घेतला. राज्यात सुमारे साडेचार कोटी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने विविध लाभ देण्यात आले. म्हणूनच हे शासन सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडविणारे सर्वसामान्यांचे शासन आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन इस्लामपूर हायस्कूल मैदानावर करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार धैर्यशील माने, आमदार सुधीर गाडगीळ, माजी मंत्री अण्णा डांगे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, महानगरपालिका आयुक्त सुनिल पवार, अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी जोमाने कामाला लागले. त्याचाच परिणाम म्हणून सांगली जिल्ह्यात 35 लाख 65 हजार लाभार्थ्यांची नोंदणी झाली. राज्यातील शेतकरी, सर्वसामान्य माणूस, गरजू, वंचित अशा सर्वांना लाभ देण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू झाले. महिला सक्षमीकरणासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्य शासनाला केंद्र सरकारचे सहकार्य मिळत असल्याने राज्याचा विकास चौफेर होतोय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सुमारे 25 कोटी जनतेला दारिद्र्यरेषेच्या वर आणण्याचे काम केले आहे. दुष्काळी भागासाठी वॉटर ग्रीड करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत 500 निर्णय घेतले. आतापर्यंत 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्याचं काम सरकारने केले. सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. तसेच 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला. तर उद्योग व्यवसाय वाढीसाठी सरकारने पाच लाख कोटीचे करार केल्याचे सांगून त्याचा चांगला परिणाम लवकरच दिसेल. सांगली जिल्ह्यातील चांदोली प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले.
पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, सांगली जिल्ह्याचे नाव काढलं की, डोळ्यासमोर येतो या जिल्ह्याने लढलेला स्वातंत्र्यसंग्राम आणि मोठमोठे उद्योजक. अनेक नामवंत व्यक्तिमत्व, उत्तम प्रशासक, दूरदृष्टी असलेले नेते राजकीय नेते, समाजकारणी या मातीने घडवले. राज्य सरकारच्या भक्कम पाठिंब्यामुळे सांगलीची विकासाकडे जोमाने वाटचाल सुरू आहे. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली. या कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात मुख्यमंत्री श्री. शिंदे तसेच पालकमंत्री डॉ. डॉ. खाडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विविध शासकीय विभागांच्या प्रमुखांसह हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘सांगली बहु चांगली’, ‘कृष्णामृत’ पुस्तकांचे प्रकाशन
दरम्यान या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘सांगली बहु चांगली’, या कॉफी टेबल बुक व सांगलीची विविध क्षेत्रातील महती व प्रगती सांगणाऱ्या ‘कृष्णामृत’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी या पुस्तकाच्या संपादनासाठी सहाय्य केलेले मंडळ जेष्ठ विधिज्ञ बाबासाहेब मुळीक, जेष्ठ पत्रकार चिंतामणी सहस्रबुद्धे, अशोक घोरपडे, इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर, तत्कालील जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर व विद्यमान जिल्हा माहिती अधिकारी फारुख बागवान यांचा पुष्प देवून सत्कार करण्यात आला.
सांगली बहु चांगली या कॉफी टेबल बुकमध्ये सांगली जिल्ह्याच्या स्वातंत्र्यचळवळ, शिक्षण, शेती, उद्योग, सहकार आदि विविध क्षेत्रातील इतिहास व प्रगतीचा चित्रमय आढावा आकर्षक पद्धतीने घेण्यात आला आहे. तसेच कृष्णामृत या पुस्तकात सांगली जिल्ह्याची स्वातंत्र्य चळवळ, राजकीय, शिक्षण, कृषि, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यिक, खाद्य क्षेत्रातील परंपरा विविध तज्ज्ञांच्या लेखणीतून कागदावर उतरली आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा विविध क्षेत्रातील देदीप्यमान, वैभवशाली व अभिमानास्पद वारसा व प्रगती दस्तावेजबद्ध करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, जिल्हा माहिती कार्यालय व संपादकीय मंडळाच्या वतीने करण्यात आला आहे.
क्षणचित्रे –
मुख्यमंत्र्यांनी महाशिवरात्रीच्या आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उपस्थितांकडून मोबाईल टॉर्च दाखवून प्रतिसाद.
शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत विविध विभागाकडून 22 स्टॉलची उभारणी.
योग्य नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व मनपा आयुक्त यांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक.
जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या वतीने करण्यात आलेल्या कॉफी टेबल बुक व कृष्णामृत सांगलीची गौरवगाथा या पुस्तकांचे मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांकडून कौतुक
या मेळाव्यासाठी महिलांची लक्षणीय उपस्थिती.
०००