‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. १३ (जिमाका) : खासगी बस सेवेशी स्पर्धा करताना ‘प्रवासी हाच आपला परमेश्वर’  असे मानून आणि ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’  या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या. त्याचा लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे सचिव पराग जैन, व्यवस्थापकीय संचालक माधव पुसेकर, गोपाल लांडगे, मिनाक्षी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला ५ हजार १५० इलेक्ट्रिक बसगाड्या आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. ‘गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी’ या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी बससेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. एसटी आपल्या परिवारातीलच एक घटक आहे. एसटीचे ग्रामीण भागाच्या विकासात मोठे योगदान आहे. अविश्रांत काम करणारा एसटी कर्मचारी आपल्या सर्वांच्या जवळचा आहे. इलेक्ट्रिक बस, सीएनजी/एलएनजी गाड्यांमुळे प्रदूषण होणार नाही. पर्यावरण पूरक वातावरण कायम राहील. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली-ठाणे-नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.

ते पुढे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एसटी बस प्रवासासाठी महिलांना 50 टक्के सवलतीत तिकीट योजना, 65 ते 75 वयातील नागरिकांना 50 टक्के सवलत तर 75 वर्ष व त्यावरील वय असलेल्या नागरिकांना मोफत प्रवास योजना या योजना महाराष्ट्र राज्यात यशस्वी झाल्या आहेत.

एसटी नफ्यात येण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. एसटी आपली आहे अशा प्रकारे तिचा सांभाळ करायला हवा, असे आवाहन करुन मुख्यमंत्र्यांनी चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत, असे निर्देश दिले. ते म्हणाले की, एस.टी आगार स्वच्छ असले पाहिजे, तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एस.टी. आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे, इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे. नवनवीन कल्पना अंमलात आणून एसटी अधिक लोकप्रिय होण्यासाठी सर्वांनी झटून काम करावे. डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून सर्वत्र उत्तम प्रकारे स्वच्छता होत आहे. शहरी व ग्रामीण भाग कचरामुक्त होण्यासाठी शासन स्तरावरुन सर्व प्रकारचे प्रयत्न होत आहेत. एसटी आगारांतर्गत स्वच्छता स्पर्धा आयोजित कराव्यात. तेथील स्वच्छतागृह उत्तम दर्जाचे असावेत. एसटी चालक-वाहक यांची विश्रांतीगृहे चांगली असावीत. एसटी कॅन्टीन चांगले असावे. तिथल्या अन्नाचा दर्जा उत्तम असावा. गाड्या स्वच्छ असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा मिळायला हवी. गेल्या आठ महिन्यांपासून आपण ‘हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत राज्यातील 193 बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा मी लवकरच आढावा घेणार आहे.

मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ‘हात दाखवा एसटी थांबवा’ या उपक्रमामुळे लोक आणि एसटीमध्ये भावनिक नाते तयार झाले आहे. एसटी कर्मचारी गावातील गरजूंना सेवा देतात. एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लावू. अनेक तीर्थक्षेत्रासाठी आपल्या एसटीच्या सेवा दिल्या जातात. राज्यातील सर्वच गाड्या चांगल्या दर्जाच्या असाव्यात. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एसटी ला नफ्यात आणू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.

सचिव पराग जैन यांनी प्रस्ताविक केले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महोदयांनी खोपट बसस्थानकाची पाहणीही केली व संबंधित अधिकाऱ्यांना बसस्थानकात अधिक  सोयीसुविधा निर्माण करण्याविषयी आवश्यक त्या सूचना दिल्या.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *