राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. 29 (जिमाका) : राज्यातील बऱ्याच दूध संघाची स्थिती ही भूषणावह नाही तथाप‍ि कोल्हापूर येथील ‘गोकुळ दूध संघाचे’ कामकाज प्रशंसनीय आहे. त्यासाठी सर्व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. राज्यासाठी गोकुळ दूध संघाचे काम पथदर्शी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज गोकुळ दूध संघाचा गौरव केला.
गोकुळचा हीरक महोत्सवी वर्षामध्ये, अद्ययावत लोणी व पेढा निर्मिती प्रकल्पाचा शिलान्यास, पेट्रोल पंप भूमिपूजन, गोकुळ श्री पुरस्कार वितरण तसेच हिरक महोत्सवी वर्षानिमित्त दूध संस्थांना- सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यावपीठावर आ. राजेश पाटील, पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, दुध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी आ. संजय घाटगे, सुजित मिणचेकर, के.पी.पाटील, माजी अध्यक्ष विश्वास पाटील, भैय्या माने, ए.वाय. पाटील, आदील फरास, बाबासाहेब आसुर्लेकर यांच्यासह गोकुळ दूध संघाचे संचालक उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, गोकुळमुळे येथील शेतकरी आर्थिक दृष्ट्या समृध्द झाला आहे. सरकार दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असून त्यांना सर्वोतोपरी सहाय्य करेल. सध्या शासन गायीच्या दूधासाठी प्रतिलिटर 5 रु. अनुदान देते. ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते. दूध  धंदा हा किफायतशीर धंदा असून शेतकऱ्यांनी त्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन करुन गोकुळ दूध संघाला सर्वोतोरी सहाय्य करण्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली.
जिल्ह्याची माती व पाणी कसदार असल्याने येथील शेतकऱ्यांनी गोकुळला वैभव मिळवून दिल्याचे गौरवोग्दार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले तर गोकुळने गुणवत्तेशी कधीच तडजोड केली नसल्याने तसेच सध्या गोकुळचे प्रती दिन 17 लाखांहून अधिक दुध संकलन होत असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविकात सांगितले. प्रारंभी गोकुळचे निर्माते स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
60 वर्षपूर्वी म्हणजेच 1963 साली लावलेल्या या संस्थेच्या रोपट्याचे – वटवृक्षात कशा पध्दतीने रुपांतर झाले अशा आशयाचा लघुपट यावेळी मान्यवरांना दाखविण्यात आला. या लघुपटाला उपमुख्यमंत्र्यांनी मनस्वी दाद दिली. तसेच ज्या संस्थांचा, दूध उत्पादकांचा सन्मान झाला आहे अशांना देण्यात आलेल्या बक्षीस रक्कमेत वाढ करुन ती रक्कम अनुक्रमे 1 लाख (प्रथम), 75 हजार (व्दितीय) तर 51 हजार (तृतीय) अशी देण्यात यावी, अशी सूचना करताच अध्यक्ष श्री. डोंगळे यांनी ती तात्काळ मान्य करत उर्वरित रक्कमेचे धनादेश संबंधितांना देण्यात येतील, असे सांगितले.
गोकुळ दूध संघाच्या प्रांगणात पार पडलेल्या या सोहळ्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कुटूंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. आभार संचालक अजित नरके यांनी मानले.
000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *