पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय क्षेत्रात आगामी काळात विविध संधी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. १३ : देशात इंद्रधनुष्याप्रमाणे कृषी क्षेत्रात हरित क्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळींच्या उत्पादनात पित क्रांती, मत्स्य उत्पादनात नील तर मांस उत्पादनात लाल क्रांती झाली. आगामी काळात पशुपालन, मत्स्य शेती व दुग्धव्यवसाय हे क्षेत्र गुंतवणुकीसाठी आकर्षक  होणार असून या क्षेत्रात गुंतवणूक, उद्योग व रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील, असा विश्वास राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला.

राज्यपाल श्री. बैस यांच्या दूरस्थ उपस्थितीत महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूरचा (माफसू)  ११ वा दीक्षान्त समारंभ झाला, त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यात पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालनाची भूमिका महत्त्वाची आहे, असे सांगून पशुविज्ञान विद्यापीठातील स्नातकांकडे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याची तसेच रोजगार निर्मिती करुन ग्रामीण भागात उपजीविका उपलब्ध करुन देण्याचे सामर्थ्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले. या क्षेत्रातील स्नातकांनी पशुपालन, दुग्ध व्यवसाय व मत्स्यपालन या क्षेत्रात उद्योग सुरु करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

विद्यापीठातील प्राध्यापक – स्नातकांनी २०२२ या वर्षी ‘लम्पी’ त्वचा रोगाच्या निर्मूलनाचे कार्य करताना अनेक प्राण्यांचे जीव वाचवले तसेच स्वदेशी गायींच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

दोन महिन्यांपूर्वी आपण गोरेवाडा नागपूर येथील वन्यजीव बचाव व प्रशिक्षण केंद्राला भेट दिली होती असे सांगून मनुष्य व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

आपल्या दीक्षान्त भाषणात मथुरा येथील पंडित दीनदयाल उपाध्याय पशुविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अनिलकुमार श्रीवास्तव यांनी दुग्ध उत्पादन क्षेत्रातील श्वेतक्रांतीचा प्रभाव व सकल मूल्य हरित क्रांतीपेक्षा अधिक असल्याचे सांगितले. अन्नधान्य उत्पादनात देश आत्मनिर्भर आहे. पोषण सुरक्षेची समस्या दूध, अंडी, मासे व मांस यांच्या माध्यमातून सोडविता येऊ शकते, असे त्यांनी सांगितले.  वातावरणातील टोकाच्या बदलांचा मोठा परिणाम कृषी व अन्नधान्य उत्पादनावर होत असून राज्यात तसेच देशात पशुसंवर्धन व मत्स्यपालन उद्योग यातील मोठ्या क्षमतांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दीक्षान्त समारोहात १७९० स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आल्या, ९५ स्नातकांना सुवर्ण व रौप्य पदके देण्यात आली तर तीन स्नातक विद्यार्थिनींना रोख पारितोषिके देण्यात आली.

यावेळी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला. ‘माफसु’चे कुलगुरु डॉ. नितीन पाटील यांनी विद्यापीठ अहवाल सादर केला.

दीक्षांत समारोपाला विद्यापीठाचे माजी कुलगुरु, इतर विद्यापीठांचे कुलगुरु, विभाग प्रमुख, शिक्षक व स्नातक उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *