दुर्गम भागातील नागरिकांच्या वैयक्तिक आणि सामूहिक लाभासाठी वचनबद्ध – आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार, दिनांक 1 (जिमाका वृत्त)नंदुरबार जिल्हा दुर्गम-अतिदुर्गम भागात गणला जातो. येथील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांच्या समृद्धीसाठी वैयक्तिक व सामूहिक योजनांचा लाभ थेट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.

अक्कलकुवा तालुक्यातील विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प. सदस्य आरिफ मक्रानी, प्रताप वसावे, पं.स.सदस्य सुधीर पाडवी,अशोक राऊत,नितेश वळवी, विनोद कामे, बबिता नाईक,विश्वास मराठे, जयमल पाडवी, अमरसिंग वळवी, जगदिश पाडवी,नटवर पाडवी,मनोज डागा,मथुराबाई पाडवी, सुरेश जैन,एस.बी.जैन, रमेश नाईक, महावीर पाडवी, शमशोद्दीम मक्रानी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ गावित म्हणाले, जिल्ह्यातील  दुर्गम, अतिदुर्गम भागातील नागरिकांना त्यांचे जीवन आत्मनिर्भर करण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या मार्फत विविध विकासाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांच्या माध्यमातून येथील नागरिकांना आपल्या गावातच स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी शासनाचा प्रयत्न आहे. तसेच महिलांनाही आपले कामकाज सांभाळून कौशल्यावर आधारित रोजगार उपलब्ध करून बचत गटांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचाही आदिवासी विकास विभागाचा मंत्री या नात्याने प्रयत्न आहे.

देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या विविध योजना खासदार डॉ. हिना गावित यांच्या माध्यमातून धुळे-नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या जात आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गाव आणि प्रत्येक नागरिकाला पाहिजे त्या सरकारी योजनांचा लाभ करून देण्याचे नियोजन असून येत्या काही दिवसात त्याचे दृश्य परिणामही जिल्हावासियांना पाहायला मिळणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *