खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.११ : शिवछत्रपती क्रीडासंकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ऑलिम्पिक भवन व म्युझियम इमारतीचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे,  क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर आदी उपस्थित होते.

देशातील पहिले ऑलिम्पिक म्युझियम विकसित होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्यालये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय, क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहेत. या इमारतीमुळे खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळेल. या इमारतीचे काम लवकरात लवकर होण्यासाठी क्रीडा विभाग आणि असोसिएशन यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना त्यांनी दिल्या.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ऑलिम्पिकच्या दृष्टीने १२ खेळांवर विशेष लक्ष देण्यात आले असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासकीय नोकरीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना जास्तीत जास्त संधी मिळावी, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तालुका क्रीडा संकुल सुस्थितीत राहण्यासाठी लोकप्रतिनिधींनी विशेष लक्ष द्यावे, असेही ते म्हणाले.

सुरुवातीस श्री. पवार यांनी प्रकल्पाची माहिती घेतली. कार्यक्रमाला विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी व खेळाडू उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *