चंदगडच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. १० (जिमाका): चंदगडच्या विकासासाठी आतापर्यंत सुमारे ८५० कोटींचा निधी दिला आहे. आता यापुढेही अधिकचा निधी देऊन चंदगडचा सर्वांगीण विकास करू. चंदगड नगरपालिकेच्या उभारणीसाठी ५ कोटींचा निधी दिला असून इमारतीच्या फर्निचर व वॉल कंपाउंडसाठी व चंदगडमधील रस्ते सुधारण्यासाठी प्रत्येकी ५-५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. चंदगड हा डोंगराळ व दुर्गम भाग असून त्याच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंदगड येथे आश्वासन दिले.

नगरपंचायतीच्या कै.नरसिंगराव गुरुनाथ पाटील रेसिडेन्सी इमारत व प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला अनावरण तसेच चंदगड नगरपंचायतीच्या वतीने नागरी सत्कार समारंभावेळी बोलत होते. या कामांना नुकतीच प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. याचबरोबर  कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून (डीपीसी) २० टक्के अधिकचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, नगराध्यक्षा प्राची काणेकर, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, चंदगड, गडहिंग्लज, आजरा या परिसरात काजू पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. काजू पीकाच्या विकासासाठी राज्य शासनाने 1 हजार 325 कोटीची तरतूद केली आहे. या निधीमधून काजू पीकाच्या विविध प्रक्रियेचा विकास होण्यास मदत होणार आहे. काजू पीकापासून वाईन बनविणे तसेच काजू बी परतावा याबाबतही लवकरच निर्णय घेतला जाईल. चंदगड मतदार संघातील जांभरे, तळकट, गोवा रस्त्याचे काम मार्गी करण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित केली जाईल, असे सांगून श्री. पवार म्हणाले  की, कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधी देण्यात येत असून वैद्यकीय सुविधांसाठी 1 हजार कोटी निधीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. आरोग्य, शिक्षण याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटनालाही चालना देण्यात येणार आहे.

भारत हा जगाच्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थेत पोहचला असून यामध्ये महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्राचीही अर्थव्यवस्था मजबूत करण्यात येत असून 1 ट्रीलीयनवर नेण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे, असे सांगून श्री.पवार पुढे म्हणाले की, नियमित कर्ज भरण्याऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये अनुदान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. सौर कुंपण योजना राबविण्यासाठी निधी देण्यात येणार असून त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. सौर पंपासाठीही अनुदान देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. चंदगडी भाषेच्या शब्दांची गंमत व त्यांचे अर्थ शेवटी त्यांनी सांगितले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, चंदगड मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वच योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येत आहे. चंदगड तालुक्यातील तिटवडे येथे धरण बांधणे, प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी येत असलेल्या तांत्रिक अडचणी दूर करून 50 हजार रूपयांचे अनुदान देण्याबाबतची कार्यवाही करू असे सांगून, चंदगड भागात पाऊस कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याची कमतरता पडू नये, यासाठी आवश्यक ते सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

आमदार राजेश पाटील यांनी चंदगड मतदार संघात आतापर्यंत 850 कोटींची कामे करण्यात आली असून पुढील काळातही विकास कामासाठी निधी मागविण्यात आला आहे. असे सांगून चंदगड येथे ट्रामा केअर युनीट व उपजिल्हा रूग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

कृषीमंत्री धनजंय मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *