जलजीवन मिशन यशस्वी करण्यासाठी जलसंधारणाची जोड, लोकसहभाग अत्यावश्यक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि. १ (जिमाका): जल हे जीवन असून निसर्गाने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. देशातील सर्वात जास्त ४० टक्के मोठी धरणे ही केवळ महाराष्ट्रात आहेत. परंतु, उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या दृष्टीने जलक्रांती घडवायची असेल तर जलजीवन मिशन यशस्वीतेसाठी जलसंधारणाची जोड व लोकसहभाग अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गुरूदक्षिणा हॉल येथे जिल्हा परिषद, नाशिक आयोजित जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन टप्पा – २ जलरथ उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील,  आमदार राहुल ढिकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे, प्रधान सचिव पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग संजय खंदारे, सचिव मृद व जलसंधारण विभाग सुनिल चव्हाण, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन जि.प. दीपक पाटील, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

जलसंधारणाचे महत्त्व ओळखून मागील काळात जलयुक्त शिवार योजना सुरू केली. यात पहिल्या टप्प्यात २२ हजार गावांपर्यंत ही योजना पोहचली आहे. लोकांनीही उर्स्फूत सहभाग घेवून यात योजनांमध्ये काम केले. यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, डिप सीसीटी. साखळी बंधारे अशा वेगवेगळ्या पद्धतींद्वारे गावागावांत जागृती होवून पाण्याचे विज्ञान लोकांना समजले. मोठा लोकसहभाग जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभाला.

या योजनेच्या माध्यमातून तयार केलेले स्ट्रक्चर्स पाणी साठवून ठेवतात त्यामुळे अभूतपर्व भूजलस्तर वाढला आहे. 2020 मध्ये सादर केलेल्या अहवालात महाराष्ट्राची जलपातळी वाढल्याचे चित्र पहावयास मिळते. बुलढाणा जिल्ह्यात जलयुक्त शिवारचे झालेले काम राज्यात पथदर्शी आहे. जलसंधारण कामात बीजीएस, नाम फाउंडेशन, आर्ट ऑफ लिव्हिंग, चंद्रा फाउंडेशन, पाणी फाउंडेशन यासाख्या संस्थांचे कामही अधोरेखित करण्यासारखे आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारच्या माध्यामातून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचा पोत सुधारून ती जमीन सुपीक झाली आहे व उत्पादकता वाढली आहे. जलसंधारणाच्या दुसऱ्या टप्प्यासही आपण मागील वर्षात सुरवात केली असून जवळपास 409 जलसाठ्यांमध्ये काम करण्यात आले त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला व जवळपास 667 कोटी लिटर पाणीसाठा तयार होवून 67 लाख टँकर यातून भरता येणे शक्य आहे. हे अल निनोचे वर्ष असून पाणी टंचाई भासणार आहे. परंतु, या काळात जलस्त्रोत सुकलेले आहेत, त्यामुळे यातून माती व गाळ काढण्याचे काम मोठ्या प्रमाणावर करता येणे शक्य आहे. व संकटाचे संधीत रूपांतर करण्याची ही वेळ आहे. त्यादृष्टीने या कामांसाठी नियोजन करण्यात आले आहे. त्या माध्यमातून 24 हजार गावात काम होणार असून 16 हजार 405 पाणी साठे गाळ काढून पुनर्जीवित होणाार आहेत. याचा फायदा 3 लाख 20 हजार शेतकऱ्यांना थेट होणार आहे. 267 लाख टँकर भरतील इतका पाणीसाठा याद्वारे तयार होणार आहे. अशा नियोजनातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल यात शंका नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, मागील वर्षाच्या काळात महाराष्ट्रात प्रत्यक्ष कृतीतून तलावातून गाळ काढून त्यांची क्षमता वाढविण्याचे काम भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून झाले आहे. आज उद्घाटन झालेल्या जलरथांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांमध्ये जल जनजागृती होणार आहे. शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध झाले तर परिणामी इतरांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात. जलयुक्त शिवार मोहिम उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मागदर्शनातून पहिल्या टप्प्यात राबविली गेली आहे. व यातून साधारण: दोन ते तीन मीटर पर्यंत पाण्याची पातळी वाढली असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रातभर दिसत आहे. डिपीडिसीच्या माध्यमातून या कामांसाठी डिझेलसाठी निधी उपलब्ध करून दिला तर निश्चितच चांगला परिणात यातून दिसून येईल, असे पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, जलजीवन मिशनच्या माध्यमातून झालेले काम निश्चितच प्रशंसनीय आहेत. जलजीवनच्या माध्यमातून कोरडवाहू जमीनीही बागायत होवू शकल्या. जलसंधारणाच्या माध्यमातून छोटे नाले व नदी यावर बंधारे बांधण्यात येत आहेत. यातून पाण्याची पातळी निश्चितच वाढीस लागली आहेत. सर्व पाणी योजना या एकमेकांना पूरक आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनांसाठी देशाला 8 लाख कोटी रूपयांची तरतूद करून महान कार्य केले आहे. जलजीवन योजनेंतर्गत जवळपास 30 हजार योजनांना प्राथमिक मान्यता दिली आहे. पाणी स्त्रोत जरी लांब असला तरी तो कायमस्वरूपी टिकला पाहिले अशा योजना तयार करावयाच्या आहेत. जलजीवनच्या माध्यमातून 98 टक्के शाळा व अंगणवाड्यांना पाणी जोडणीद्वारे पाणी पोहचले आहे. जलजीवन मिशनचे फायदे नागरिकांनी ओळखून या योजनांचे सवंर्धन करावे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

भारतीय जैन संघाचे अध्यक्ष मुथा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपमुख्यमंत्री  श्री. फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जलरथांना हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *