उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अराईज इंटरनॅशनल स्कूल नूतन इमारतीचे उद्घाटन

पुणे,दि.९: शिक्षण अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देते, शिक्षणामुळे श्रमाचे मूल्य आपल्याला कळते. प्रतिभावंत आणि चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे. शिक्षणाचे महत्व लक्षात घेता शिक्षणसंस्थामधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले करण्यासाठी नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार आहे, असे  प्रतिपादन श्री.पवार यांनी यावेळी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कुलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला क्रीडा व युवक सेवा मंत्री संजय बनसोडे, माजी आमदार आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर, विलास लांडे, प्रतिभा पाटील कव्हेकर, प्राचार्य कनिका आनंद आदी उपस्थित होते.

श्री.पवार म्हणाले, उद्योगनगरी आणि कामगार नगरी पिंपरी चिंचवडचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्याने या परिसराचे सर्व सुविधांनी युक्त शहरात रुपांतर झाले आहे. पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक शहर बनविण्यासाठी  उत्तम विकासयोजना राबविण्याचा प्रयत्न आहे. विकसीत शहरात उत्तम शैक्षणिक सुविधा असणे गरजेचे आहे.

शहरात जेव्हा चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात तेव्हा पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी अशा ठिकाणी पाठवतात. शिक्षण संस्थांमधून इंग्रजीतून ज्ञान देतांना आपली मराठी भाषेचेही ज्ञान असणे आवश्यक आहे. विद्यादान हे उदात्त भावनेने केल्यास आणि उत्कृष्टतेचा ध्यास धरल्यास चांगले विद्यार्थी घडविता येतील.  गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत कौशल्ययुक्त शिक्षण देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिक्षणसंस्थांनी करावी, असे आवाहन श्री.पवार यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांना मराठीसोबत इंग्रजीचेही ज्ञान असणे गरजचे आहे. महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली मातृभाषा म्हणून मराठीचे ज्ञान असलेच पाहिजे. मराठी भाषा पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजे. आपल्या मातृभाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनही यादृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी १९८३ मध्ये सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाचे रुपांतर आज वटवृक्षात झाले आहे. ज्ञानविज्ञानाच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी घडविण्याचे कार्य या संस्थेद्वारे होत आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. अराईज इंटरनॅशन स्कूलचे कार्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गारही उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले.

श्री. बनसोडे म्हणाले, श्री. कव्हेकर यांनी संस्थेची स्थापना १९८३ साली केली. श्री. कव्हेकर यांचे कार्य स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित आहे. या संस्थेतील कर्मचाऱ्यांची  निवड करत असताना त्याचे चरित्र, गुणवत्ता विचारात घेतली जाते. संस्थेत शिक्षणाबरोबर अध्यात्मिक, योगविद्येचेही शिक्षण दिले जाते, तेजस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी संस्थेचे कार्य महत्वपूर्ण आहे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकात श्री. कव्हेकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. यावेळी ‘इतिहासा’ या पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *