श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनामुळे कोल्हापूरच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीस गती मिळेल– उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. १० (जिमाका): गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री सुरगीश्वर संस्थानने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. उभारण्यात येणाऱ्या भवनाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या अध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचे काम घडेल, असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी, वैद्यकिय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, अपर पोलीस अधीक्षक (गडहिंग्लज) निकेश खाटमोडे- पाटील, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, अभियंता अभिजित चौगुले, नूलच्या सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, ए.वाय. पाटील, बाबासाहेब पाटील, जयसिंगराव चव्हाण, गुरुकुल मधील शिष्यगण मुरगेंद्र हिरेमठ, ईश्वर स्वामी, गणेश जंगम, शिवानंद स्वामी, कार्तिक हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या भवनामुळे सर्वसामान्यांची मंगलकार्ये पार पडणार आहेत. तसेच या भवनात सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्ग, स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्र व सेंद्रीय शेती प्रशिक्षण केंद्र असेल. सीमा भागातील नागरिकांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्री सुरगीश्वर संस्थान मठाला भेट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री सुरगीश्वर संस्थान मठाला भेट देऊन गुरु लिंगैक्य ष.ब्र. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेतले. तसेच श्री सुरगीश्वर मठाची पाहणी करुन मठाधिपती श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामिजींसोबत संवाद साधला.

यावेळी श्री सुरगीश्वर संस्थानच्या सेंद्रिय शेती, गुरुकुल व सामाजिक उपक्रमांची माहितीही यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी घेतली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *