गवळीवाडा येथील मालमत्ता नियमानुकूल करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ -मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. १३: वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील गवळीवाडा मधील मालमत्ता नियमानुकूल करण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.

मंत्रालयात आज महसूल मंत्री श्री.विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच बैठकीस  सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे ऑनलाईन दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.

महसूल मंत्री श्री विखे -पाटील म्हणाले, या अनुषंगाने परिपूर्ण प्रस्ताव मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल. आकारीपड बाबत घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर यावर मार्ग काढून शासन निर्णय होण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांनी  सावंतवाडी संस्थानने पूर्वीच्या काळात घेतलेल्या निर्णयाशी सुसंगत बाबी राज्यातील इतर जिल्ह्यात नसल्याकारणाने नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी यापूर्वी देखील शासनाने दोनदा शासन निर्णय निर्गमित केले आहेत. याभागातील विषयाबाबत सावंतवाडी संस्थानच्या अनुषंगाने असलेले ऐतिहासिक संदर्भ सांगितले. शासकीय ७/१२ नोंदणी मध्ये देखील याची नोंद गवळ्यांची घरे आहेत असे सागितले.

बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला नगरपरिषद हद्दीतील कॅम्प  गवळीवाडा भोगवटादारांच्या मालमत्ता नियमानुकूल करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. मंत्री श्री.विखे पाटील यांनी केलेल्या सूचना नुसार महसूल उपायुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी  माहिती दिली. यावेळी तहसीलदार वेंगुर्ला ओंकार ओतारी, सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन वालावलकर आणि वेंगुर्ला येथून आलेले पाच जणांचे शिष्टमंडळ प्रतिनिधी दिगंबर जगताप व प्रसाद बाविस्कर उपस्थित होते.

००००

किरण वाघ/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *