कोकण विभागीय नमो महारोजगार मेळाव्याचे ठाणे येथे २४ व २५ फेब्रुवारी रोजी आयोजन -कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. ६ : कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत बेरोजगार युवक तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी हायलॅण्ड ग्राऊंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे (पश्चिम) येथे कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक व युवतींकरिता  ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात स्टार्टअप एक्सपोचे देखील  आयोजन करण्यात आले असून हा मेळावा २४ आणि २५ फेब्रुवारी २०२४  रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल. या मेळाव्यात नोकरी इच्छुक युवक-युवती यांनी मुलाखतीसाठी आणि महाएक्सपो मध्ये स्टार्टअप्स, इनव्हेस्टर्स व इनकुबेटर्स  या सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले आहे.

मंत्री श्री.लोढा म्हणाले की, दहावी, बारावी,आय.टी.आय., पदविका,पदवीधर,पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या तेथेच मुलाखती घेत रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. https://qr-codes.io/gdhSNd  किंवा www.rojgar.mahaswayam.gov.in या लिंक वरती जाऊन उमेदवार नोंदणी व नोकरीकरिता अर्ज करून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. एका पेक्षा अधिक नोकरीसाठी देखील एकाच उमेदवाराला अर्ज करुन मुलाखत देता येतील. रोजगार मेळाव्यात सहभागी होणा-या उमेदवारांनी मेळाव्याच्या अगोदर ही नोंदणी करणे आवश्यक आहे.जे उमेदवार मेळाव्याच्या अगोदर नाव नोंदणी करतील, त्याच उमेदवारांच्या मेळाव्याच्या दिवशी मुलाखती होणार आहेत. या माध्यमातून  दोन लाख युवक आणि युवतींना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांनी मिळून हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी कसून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

नमो महारोजगार मेळाव्याकरिता जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होण्याकरिता कौशल्य विकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय तसेच उद्योग व कामगार विभाग यांना विविध कंपन्याशी संपर्क साधून रिक्त पदे अधिसूचित जाहीर करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत

कोकण विभागांतर्गत ठाणे, पालघर, रायगड,सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर, मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापनांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर उद्योजक नोंदणी करून रिक्त पदे अधिसूचित/जाहीर करणे आवश्यक आहे. याबाबत काही अडचण असल्यास संबंधित जिल्ह्यातील नोडल अधिकारी यांच्याशी किंवा 1800 120 8040 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

-000000-

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *