लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली,(जिमाका)दि.04: लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचत पोलिस विभागाने पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचे काम केले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरन घडविण्याचे कामामुळे जनसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

गडचिरोली महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व हस्तकला प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काल भेट दिली त्याप्रसंगी ते बोलत होते. गडचिरोली पोलिस दलातर्फे जिल्हा परिषद मैदान येथे 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यात गडचिरोली महोत्सव-2024 चे आयोजन करण्यात आले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती एम.डब्ल्यू.चांदवाणी, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी संजय मीणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायायाधीश आशुतोष करमरकर, कुलगुरू प्रशांत बोकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक कुमार चिंता, एस रमेश (अहेरी) व प्रतीश देशमुख,(अभियान)  आदी यावेळी उपस्थित होते.

श्री फडणवीस पुढे म्हणाले की गडचिरोलीची ओळख भारताचा पुढील ‘स्टील हब’ होणार असून त्याद्वारे स्थानिकांसाठी येथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. गडचिरोली येथे मेडीकल कॉलेज, विमानतळ व रेल्वे मार्गाचे काम होत आहे. तसेच हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग गडचिरोलीपर्यंत विस्तारीत करून मुंबईशी जोडण्यात येणार आहे. याशिवाय येथील नद्यांमधून आंध्रप्रदेशच्या बंदरांपर्यंत जलवाहतूक मार्ग तयार करण्यासाठी अभ्यास गट निर्माण केला आहे. एकंदर रस्ते, रेल्वे, जल व वायु मार्गाद्वारे गडचिरोलीला जगाशी जोडण्यात येवून त्याद्वारे गडचिरोलीचा विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  यासोबतच सिरोंचा येथे शैक्षणिक हब तयार करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून वेगाने विकासाकडे जात असलेली गडचिरोलीची विकासयात्रा आता थांबणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री यांनी दिली. विकास कामे करतांना गडचिरोलीचे वैभव असलेले जंगल, पर्यावरण आणि आदिवासी संस्कृती टिकविण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल यांनी प्रास्ताविक केले. पोलिस विभागाद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक कार्याची माहिती त्यांनी दिली.

तत्पुर्वी उपमुख्यमंत्री श्री फडणवीस, अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री आत्राम व इतर अतिथींनी हस्तकला प्रदर्शनाला भेट देवून विविध वस्तूशिल्पची पाहणी केली. जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील हस्तकला कारागिरांना गडचिरोली महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या कलाकृती विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री फडणवीस यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले.

 

यावेळी गडचिरोली महोत्सवांतर्गत सादर करण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी रेला नृत्य व फायर-शो चा आनंद  हजारो प्रेक्षकांसह उपमुख्यमंत्री व इतर मान्यवरांनी घेतला.

तत्पुर्वी सांस्कृतिक महोत्सवांतर्गत झालेल्या व्हॉलीबॉल, कबड्डी व रेला नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते बक्षीस वितरीत करून गौरविण्यात आले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *