शासनाकडून सोलापूर महापालिकेला उजनी पाईप लाईनसाठी २६७ कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार     

सोलापूर, दिनांक 3(जिमाका):- महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत सोलापूर महापालिकेला उजनी येथून पाईपलाईन टाकण्यासाठी आवश्यक असलेला राज्य शासनाचा 267 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यातील सुमारे 90 कोटींचा पहिला हप्ता पुढील दोन दिवसांत देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिली.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, आमदार संजय शिंदे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले, शहर पोलिस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, एमजीपीचे कार्यकारी अभियंता अनिल पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, सोलापूर शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत उजनी धरणातून 170 दशलक्ष लिटर पाणी सोलापूर शहराला दररोज आणण्यासाठी 894 कोटींचा प्रकल्प मंजूर केलेला आहे. या अंतर्गत कामे सुरू आहेत. राज्य शासनाचा 267 कोटींचा हिस्सा लवकरच देण्यात येणार असून, त्यातील पहिला टप्पा सुमारे 90 कोटी पुढील दोन दिवसात उपलब्ध करून देण्यात येतील. तरी महापालिकेने या अनुषंगाने पुढील कामे त्वरित पूर्ण करून  सोलापूर शहरातील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

त्याप्रमाणेच सोलापूर शहर महापालिकेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जुना पुना नाका ते पत्रकार भवन व जुना बोरामणी नाका ते मोरारका बंगला असे दोन उड्डाणपूल मंजूर असून भूसंपादनासाठी 101 कोटींचा  शासन हिस्साही लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उजनी धरण पाणी पातळी कमी झाल्याने शहरातील लोकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दुबार व तिबार पंपिंग महापालिकेला करावे लागते, त्यासाठी आवश्यक असलेला 3.54 कोटीचा तर हुतात्मा स्मृती मंदिराच्या नूतनीकरणासाठी 3.36 कोटीचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

यावर्षी पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात टंचाई सदृश्य परिस्थिती आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत त्यातून प्रत्येक गावात पाणीपुरवठा झाला पाहिजे यासाठी सांगोला प्रादेशिक पाणीपुरवठा योजना चांगल्या प्रकारे चालवली जात आहे, तरी याच धरतीवर जिल्ह्यातील सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना संबंधित यंत्रणांनी चालवल्या पाहिजेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन प्रत्येक गावात आवश्यक त्या ठिकाणी पाणीपुरवठा उपाययोजना कराव्यात. तसेच जनावरांना माहे जून 2024 अखेरपर्यंत चारा उपलब्ध होईल यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश देऊन बियाणे महामंडळाने टंचाई परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्याला चारा बियाणे तात्काळ उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी निर्देशित केले.

पंढरपूर देवस्थान आराखड्यातर्गंत 73 कोटींचा निधी मंजूर असून, या अंतर्गत पुरात्व विभाग काम करत असून माहे मार्च 2024 पर्यंत त्यांना आवश्यक असलेला पाच कोटीचा निधी त्वरित देण्यात येत आहे. या अंतर्गत कामे करत असताना पुरात्व विभागाने लोक भावना लक्षात घेऊन कामामध्ये वेगळेपणा व नाविन्यता आणावी. यासाठी उज्जैन अयोध्या व वाराणसी येथे जाऊन तेथील मंदिराचे केलेले नूतनीकरण कामाची पाहणी करून माहिती घ्यावी व त्या पद्धतीने येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कशा पद्धतीने चांगल्या व दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना श्री. पवार यांनी दिल्या.

जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन निर्माण करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. यासाठी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करून घ्यावी. या ठिकाणी महिला बचत गटांच्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयास सोलर पॅनल बसवण्याबाबत आराखडा तयार करावा व प्रत्येक शासकीय कार्यालयात सोलर पॅनल बसवून वीजे वरील खर्च कमी करावा. होटगी रोड विमानतळ येथे सुरू असलेली कामे त्वरित मार्गी लावून हे विमानतळ लवकर सुरू करण्याबाबत प्रशासनाने प्रयत्न करावेत. तसेच जिल्हा नियोजन समितीचा मंजूर असलेला 490 कोटींचा निधी आचारसंहिता लागण्यापूर्वी शंभर टक्के खर्च होईल यासाठी सर्व शासकीय यंत्रणानी प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईच्या अनुषंगाने माहिती दिली. जिल्ह्यातील पाच तालुके(बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा व माढा) दुष्काळी तालुके म्हणून जाहीर केलेले असून 45 महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केलेला आहे. प्रशासनाने 55 कोटीचा टंचाई आराखडा तयार केलेला असून सद्यस्थितीमध्ये चार गावांमध्ये चार टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, पुढील 115 दिवस पुरेल एवढा चारा जिल्ह्यात उपलब्ध आहे. तर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चारा बियाण्यांसाठी 8 कोटीचा निधी मंजूर केलेला असून त्यातील 3.50 कोटीच्या निधीतून चारा बियाणे खरेदी केले असून उर्वरित 4.50 कोटी निधी त्वरित पशुसंवर्धन विभागाला चारा खरेदीसाठी उपलब्ध केला जाणार आहे. जिल्हा प्रशासन पाणी व चारा टंचाई परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्ह्यात कोठेही पाणी अथवा चाऱ्याची टंचाई भासणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जिल्हा नियोजन समितीचा मंजूर असलेला निधी शंभर टक्के खर्च होईल यासाठी नियोजन केल्याची माहितीही त्यांनी दिली.

महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर महापालिकेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची तसेच एसटीपी प्रकल्प, ड्रेनेज प्रकल्प व वाढीव पाणीपुरवठा योजना, रस्ते तसेच उड्डाणपुलाच्या कामांची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोहिनकर यांनी जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती बैठकीत सादर केली. तर तेजस्विनी आफळे यांनी पंढरपूर देवस्थान विकास आराखड्याची माहिती दिली.

श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *