जर्मनीला कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार

मुंबई, दि. ३० : जर्मनीला  किमान ४ लाख कुशल, प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मन येथे रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आज मंत्रालयात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जर्मनी शिष्टमंडळातील फ्रॅंक झुलर, अंद्रेस रिस्किट, ओमकार कलवाडे यांच्या समवेत जर्मन शिष्टमंडळाची बैठक झाली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. यासाठी राज्यातील विद्यार्थ्यांची माहिती संकलन करून, या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे शिक्षण हे अकृषी विद्यापीठाच्या माध्यमातून देण्यात येईल. त्यानंतर जर्मन कंपन्यांकडून मुलाखती घेऊन त्यांची निवड केली जाईल.

या निवडलेल्या विद्यार्थ्यांना जर्मन येथे जाण्याची व्यवस्था शासनाकडून केली जाईल. जर्मन येथे गेल्यानंतर त्यांचे किमान तीन महिन्याचे प्रशिक्षण होईल. मात्र यामध्ये काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा संबंधित कंपनीकडून नाकारले तर त्यांना किमान तीन महिन्यांचा भत्ता देणे अनिवार्य करावे, अशा सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग  तंत्रज्ञान वापरण्याचे युग आहे. नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून युवा पिढी एकापेक्षा अधिक कौशल्य विकास प्राप्त करू शकते. जर्मनी येथे संधी मिळालेले विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीने आपल्या देशाची, राज्याची वेगळी ओळख निर्माण करतील असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

0000

काशीबाई थोरात/विसंअ/

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *