प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

हिंगोली येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार
जिल्हा वार्षिक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या 250 नवीन रोहित्राचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण
पोलीस विभागाला पुरविण्यात आलेल्या नवीन स्कार्पिओ वाहनाचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण 

(जिमाका), दि.26 : राज्यघटनेमुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आज भारतीय संविधानातील मुल्यांमुळेच भारतीय लोकशाही  जगात सर्वश्रेष्ठ मानली जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी केले .

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त हिंगोली येथील संत नामदेव कवायत मैदान येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी आमदार रामराव वडकुते, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, राज्य राखीव पोलीस बलाच्या महानिदेशक पोर्णिमा गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणाले की, घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अमूल्य योगदान लाभलेल्या लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेल्या भारतीय राज्यघटनेची 26 जानेवारी, 1950 रोजी देशात अंमलबजावणी सुरु झाली. आणि जगात भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातही अभूतपूर्व प्रगती करीत देशाच्या विकासामध्ये नेहमीच सिंहाचा वाटा उचलला आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सांगण्यास आनंद वाटत असल्याचेही यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

हिंगोली येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. तसेच या महाविद्यालयासाठी अधिष्ठाताचीही नेमणूक केली आहे. या महाविद्यालयासाठी वळू माता प्रक्षेत्राची 15 हेक्टर 29 आर जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय व अद्यावत रुग्णालय उभारण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरु आहे. लवकरच मान्यता मिळाल्यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी 100 गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डॉक्टर होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

हिंगोली जिल्हा रुग्णालयाने भारत सरकारच्या महत्वकांक्षी उपक्रमातील ई-संजीवनी ऑनलाईन ओपीडीद्वारे आतापर्यंत 70 हजाराच्या वर रुग्णांना आरोग्य सेवा देऊन देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली असून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी विविध विज ग्राहकांचे नादुरुस्त रोहित्र त्वरीत बदलण्यासाठी जिल्हा वार्षीक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपयांच्या निधीतून 100 केव्हीए क्षमतेचे 250 विद्युत रोहित्र पुरविण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात जून व जुलै, 2023 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 15 हजार 924 शेतकऱ्यांच्या 16 हजार 599 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना 14 कोटी 54 लाख 28 हजार 200 रुपयाचा निधी मंजूर केला आहे. हा निधी शासनाकडून डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच नोव्हेंबर, 2023 मध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे 2 लाख 57 हजार 197 शेतकऱ्यांच्या  1 लाख 23 हजार 164 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. या सर्व बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन 167 कोटी 86 लाख 64 हजार रुपयांची मागणी शासनाकडे पाठविली आहे. लवकरच त्यांनाही मदत देण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री. अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कमी पर्जन्यमान झालेल्या 17 महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करुन त्या गावातील नागरिकांना विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. तसेच हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन 1 हजार 368 गावासाठी नळ योजना दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे, कुपनलिका घेणे, खाजगी विहिर अधिग्रहीत करणे, विहिरीचे खोलीकरण, टँकरने पाणी पुरवठा करणे यासह विविध उपाययोजना करण्यासाठी 16 कोटी 58 लाख 62 हजार रुपयाचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही विशेष मोहीम  24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 476 गावांमध्ये ही संकल्प यात्रा पोहचली असून यामध्ये 2 लाख 1 हजार 67 नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे.  हिंगोली जिल्हा पोलीस विभागाने वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रोजगार मेळावे, क्रीडा स्पर्धा, पोलीस दरबार, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान, विशेष कामगिरी करणाऱ्या तीन पोलीस स्टेशनला बक्षीस यासह विविध उपक्रम राबवून सामाजिक व कायदेशीर कामगिरी करत एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

राज्य शासनाने राज्यातील न जोडलेल्या वाड्यावस्त्या जोडण्यासाठी व ग्रामीण भागातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2015 पासून सुरु केली आहे. या योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 845 किमी लांबीचे 249 रस्ते मंजूर करण्यात आली आहेत. यापैकी 210 कामे पूर्ण झाली असून 37 कामे प्रगतीपथावर असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले.

मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाला न्याय देण्यासाठी राज्य शासनाने मागासवर्गीय आयोगाच्या निर्देशानुसार मराठा व खुल्या प्रवर्गातील समाजाचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने हिंगोली  जिल्हा प्रशासन सज्ज असून दि. 23 जानेवारी, 2024 पासून प्रत्यक्षात सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण 31 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी 182 पर्यवेक्षक व 3 हजार 575 प्रगणकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.

संविधानामुळे नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाला, हे आपणांस माहितच आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्व असून आपण जनता, लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून देशाच्या सर्वा‍गिंण विकासासाठी काम करत आहोत. राज्य तसेच आपल्या जिल्ह्याची चौफेर प्रगती व्हावी यासाठी जागरुक नागरिक म्हणून आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

यावेळी नादुरुस्त रोहित्र तात्काळ बदलण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या 4 कोटी 32 लाख रुपये निधीतून देण्यात आलेल्या 250 नवीन रोहित्राचे लोकार्पण पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच पोलीस विभागासाठी देण्यासाठी आलेल्या नवीन स्कार्पिओ वाहनाचे लोकार्पणही पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परेडचे निरीक्षण केले. यावेळी राज्य राखीव दल, पोलीस, गृहरक्षक दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. तसेच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर यांच्या भेटी घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच शहीद गणपत भिकाजी रणवीर यांचे विर पिता भिकाजी रणवीर व वीरमाता लक्ष्मीबाइ रणवीर यांचा पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी सशस्त्र सेना ध्वज निधीचे उत्कृष्ट संकल्न केल्यामुळे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांचा प्रशस्तीपत्र व स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंडित अवचार यांनी केले. या ध्वजारोहण कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*****

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *