मुख्यमंत्र्यांनी दिली प्रदूषण नियंत्रण, महिला सक्षमीकरणाची माहिती
मुंबई दि. २६: आज भारताच्या प्रजासत्ताक दिनी मुंबईतल्या वातावरणातला जिवंतपणा, चैतन्य आणि विशेषत: तरुणांचा उत्साह याचा अनुभव घेतल्याने मी खरोखरच प्रभावित झालो आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आज झालेल्या चर्चेत आपल्या भावना व्यक्त केल्या. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण विकास सुरु आहे तो देखील चकित करणारा आहे असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्यासमवेत वर्षा शासकीय निवासस्थानी संयुक्त राष्ट्र अधिकारी व प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत आज दुपारी बैठक झाली.
प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी डेनिस फ्रान्सिस यांना गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. या बैठकीस संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत रुचिरा कंभोज, स्टीव्हन फिलिप, कैशा मॅकग्वेरे, स्नेहा दुबे, स्टीव्हन फिलिप, शॉम्बी शार्प, हम्मा मरियम खान उपस्थित होते. तर राज्य शासनातर्फे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, परराष्ट्र मंत्रालयाचे राजेश गावंडे, मनपा अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे हे देखील बैठकीत सहभागी झाले होते.
यावेळी डेनिस फ्रान्सिस यांनी आपल्या त्रिनिदाद आणि टोबैगो देशाच्या भारताशी पूर्वापार असलेल्या संबंधाला उजळणी दिली. ते म्हणाले की, त्रिनिदाद असेंब्लीमध्ये असलेले सभापतींचे आसन हे भारताने भेट म्हणून दिलेले असून या आसनाच्या साक्षीने अनेक चांगल्या घटना घडल्या आहेत.
मुंबईत चैतन्य
मी भूगोलाचा विद्यार्थी असून भारत हा माझा अभ्यासाचा विषय होता असे सांगून डेनिस फ्रान्सिस यांनी भारतात मुंबईचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, मुंबईत चित्रपटसृष्टी आहे आणि मी देखील काही चित्रपट पहिले आहेत, मात्र यावेळी मुंबईत ज्या प्रमाणात गृहनिर्माण तसेच पायाभूत सुविधांची कामे सुरु आहेत ते चकित करण्यासारखे आहे. महाराष्ट्र हे देशातले एक मोठे औद्योगीकरण झालेले राज्य आहे त्यामुळे मुंबईचे एक वेगळे महत्त्व आहे असेही ते म्हणाले.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडला उपस्थित असतांना विशेषत: तरुण मुले, मुली, लहान मुलं यांच्यामध्ये असलेली देशप्रेमाची झलक आणि त्यांच्यातले चैतन्य पाहून मी प्रभावित झालो असे सांगून ते म्हणाले की, आज शांतता आणि सुरक्षेचे जगात महत्त्व असून सध्याच्या अस्थिर अशा जागतिक वातावरणात भारताची भूमिका मोठी आणि निर्णायक आहे. मी महासभेचा अध्यक्ष म्हणून संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांत विश्वास वाढीस लागावा आणि विविध प्रश्नांवर तोडगा निघावा म्हणून प्रयत्न करतोय, त्यात महात्मा गांधींच्या विचारावर चालणारा भारतासारखा देश मला महत्त्वाचा वाटतो.
प्रदूषणावर मात, महिला सक्षमीकरण – मुख्यमंत्र्यांनी मांडले मुद्दे
प्रारंभी शिष्टमंडळाचे स्वागत करून मुख्यमंत्री म्हणाले की, संयुक्त राष्ट्राच्या दृष्टीने प्राधान्याचा असलेला हवामान बदलाचा विषय महाराष्ट्रात देखील महत्त्वाचा आहे. आमचे शासन पर्यावरणपूरक विकासावर भर देणारे असून शाश्वत विकास हेच ध्येय आहे. प्लास्टीकवर बंदी, बांबू लागवड, ग्रीन हायड्रोजन धोरण तसेच मुंबईत सुरु असलेली डीप क्लिनिंग मोहीम अशी पावले टाकून पर्यावरण संरक्षण करीत आहोत असे ते म्हणाले. महिलांच्या बचत गटांना अधिक सक्षम करीत आहोत तसेच लेक लाडकीसारख्या योजनेतून मुलींचे कल्याण करण्यात येत आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
वडापाव, जिलेबीचा मेन्यू
आजच्या या बैठकीसाठी चहापानाबरोबर खास मुंबईचा वडा पाव आणि जिलेबी असे पदार्थ ठेवण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्यांना या पदार्थांच्या लोकप्रियतेविषयी सांगितले व आग्रह केला. संयुक्त राष्ट्राचे अध्यक्ष आणि इतर प्रतिनिधी यांनी या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि याविषयीही जाणून घेतले. प्रारंभी राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर पाटणकर यांनी प्रास्ताविक केले.
०००