मुंबई, दि. 24 : केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेद्वारे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 0 ते 6 महिने वयोगटातील मुले, गरोदर व स्तनदा माता यांना घरपोच आहार देण्यात येतो. विभागामार्फत आहार पुरवठा संनियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली असून या प्रणालीचे उद्धाटन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्रालयात महिला व बालविकास मंत्री कु. तटकरे यांच्या हस्ते आहार पुरवठा संनियंत्रण प्रणालीचे उदघाटन करण्यात आले. यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या प्रणाली अंतर्गत लाभार्थ्याना वेळेवर आहार पोचतो का हे तपासता येणार आहे. तसेच आहाराची गुणवत्ता याबाबतही माहिती मिळणार आहे. याचबरोबर घरपोहोच आहार(THR ) ची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदविता येणार आहे. तसेच ‘टीएचआर’ कोणत्या अंगणवाडीत किती तारखेला पोचला याबाबत विभागाचे सचिव, आयुक्त, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हे ऑनलाईन पाहू शकणार आहेत.
टीएचआर पुरवठा अंगणवाडी स्तरावर करण्यात आला आहे का नाही याची खात्री करण्यासाठी या प्रणालीमार्फत लाईव्ह ट्रॅकिंग करण्यात येणार आहे. टीएचआर उशिरा पोचल्यास किती दिवस उशिरा पोचला, त्याच्या दंडाची परिगणना करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे टीएचआर पुरवठ्याचे मॉनिटरिंग योग्य रितीने करण्यात येणार आहे.
टीएचआर आहार पुरवठ्याचे चलन मोबाईलवर QR कोडद्वारे स्कॅन करून मागणी करण्यात आलेला टीएचआर विहित वेळेत अंगणवाडीला पुरवठा झाला का नाही याची खात्री करता येणार आहे. यामुळे जवळपास70 लाख लाभार्थ्याना विहित वेळेत आहार पुरवठा करण्यास प्रणाली ही उपयुक्त ठरणार आहे
हे ॲप्लिकेशन अंगणवाडी सेविका त्यांच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करण्यासाठी https://play.google.com/store/apps/details?id=com.awzpact.icdsmh.fsms या लिंक चा वापर करू शकतील.
००००
काशीबाई थोरात/विसंअ