अंबरनाथ, कल्याण व मुरबाड तालुका क्रीडा संकुलाची कामे तातडीने पूर्ण करा – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ३ : अंबरनाथ, कल्याण व मुरबाड येथील तीनही तालुका क्रीडा संकुलाची उभारणी तसेच डागडुजी संदर्भात १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, नांदगाव, मनमाड येथील क्रीडा संकुलांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी मंत्री श्री. भरणे बोलत होते.

VIRENDRA DHURI

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, कल्याण क्रीडा संकुलात क्रीडा साहित्य खोली, तारेचे कुंपण, २०० मीटर धावण मार्ग तयार करण्यात यावा. मुरबाड येथे सद्यस्थितीत संकुलाच्या प्राप्त जागेवरच संकुल उभारणी करणे व अतिक्रमण रोखण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्यात यावी. अंबरनाथ येथील तालुका क्रीडा संकुलात पावसामुळे पडझड झाली तेथील दुरूस्तीचे काम तातडीने करावे.

मनमाड येथील महर्षी वाल्मिकी क्रीडा संकुलामध्ये क्रीडा संदर्भात सर्व साहित्य पुरविण्यात यावे. इनडोअर जिम साहित्य, महिलांसाठी योगा, मेडिटेशन, हॉल बांधणे, सोलर पॅनल व त्यासंदर्भात कामे, नांदगाव येथे इनडोअर कबड्डी मॅट स्टेडियम बांधणे, संरक्षक भिंत, व्यायाम साहित्य, सोलर पॅनल पुरविण्यासंदर्भातील कामांची कार्यवाही करण्यात यावी.

सांगली येथील कवठेपिरान येथे पै.कै. हिंदकेसरी जाकार्तावीर मारूती माने स्मारक समितीच्या मागणीनुसार स्मारकास परिसरात संरक्षण भिंत उभारणे आणि पुतळ्यात योग्य त्या सुधारणा करण्याचे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

यावेळी आमदार किसन कथोरे, सदाशिव खोत, सुहास कांदे, प्रभारी आयुक्त सुधीर मोरे, उपसचिव सुनिल पांढरे, उपसंचालक सुहास पाटील, माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, तहसिलदार अभिजित देशमुख, अमित पुरी, उपअभियंता संजय कोरडे, मदन हिरवे यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी, तालुका क्रीडा अधिकारी उपस्थित होते.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *