यवतमाळ, दि. ८: जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित गावांमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांनी आज प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. बाभूळगाव, नेर आणि दारव्हा तालुक्यातील विविध गावांना भेट देत त्यांनी शेतीचे झालेले नुकसान व खरडून गेलेल्या जमिनींची पाहणी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पारदर्शकपणे सर्वेक्षण व पंचनामे तातडीने पूर्ण करून बाधितांची यादी गावात प्रसिद्ध करावी. सर्वेक्षणातून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
‘खऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाच मदत’
अतिवृष्टी व पुरामुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठीचा प्रस्ताव सादर करताना प्रत्यक्षात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची अचूक नोंद घ्यावी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याचीही दक्षता घ्यावी. पंचनामा व सर्वेक्षणाच्या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
रस्ते, पूल व पाणंद रस्त्यांच्या कामाचे प्रस्ताव सादर करा
पाहणी दौऱ्यात पालकमंत्री राठोड यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेतल्या. रस्ते, पूल, पाणंद रस्ते आदींबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांचे प्रस्ताव सादर करावे. या प्रस्तावांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी आश्वास्त केले.
चार तालुक्यातील गावांमध्ये केली नुकसानीची पाहणी
पालकमंत्री राठोड यांनी बाभूळगाव तालुक्यातील मांगसावंगा, हस्तापूर, वाटखेड (बु.) आणि नांदुरा, नेर तालुक्यातील दगड धानोरा व मोझर, तसेच दारव्हा तालुक्यातील डोल्हारी (शेंद्री) आणि दहेली या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
०००