मुंबई, दि.२१ : मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार असून मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.
आज जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांना भेट देऊन तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याच्या सूचना दिल्या.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र वैद्यकीय मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात आवश्यक औषध साठ्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत. तसेच या ठिकाणी ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्रावर नियुक्त मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी मदत कक्ष तर राजकीय प्रतिनिधींसाठी चौकशी कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तसेच जागोजागी दिशादर्शक फलक लावून प्रवेशाबाबत माहिती देण्यात आली आहे.
मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. या कक्षाच्या ठिकाणी तसेच मतमोजणी केंद्राच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी भोजन व नाश्त्याची व्यवस्था असणार आहे. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव अग्निशमन दलाच्या गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष तयार करण्यात आला आहे.मतमोजणी केंद्रावर नियमित, सुरळित विद्युत पुरवठा राहावा यासाठी आवश्यकता उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी केंद्र खालील प्रमाणे
१) किचन हॉल, तळमजला, भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रिडा संकुल, धारावी बस डेपो जवळ, सायन वांद्रे लिंक रोड, धारावी, मुंबई
२) न्यू सायन म्यूनिसिपल स्कूल, प्लॉट नं. 160/161 स्कीम 6 रोड नं. 28, लॉयन ताराचंद बाप्पा हॉस्पिटलजवळ सायन (प), मुंबई
३) महानगरपालिका न्यू बिल्डींग, सी. एस नं. 355- बी, स्वामी वाल्मिकी चौक, हनुमान मंदिर समोर, विद्यालंकार मार्ग, अॅन्टॉप हिल, मुंबई
४) एमराल्ड हॉल, डॉ. अँथोनिया, डी. सिल्वा माध्यमिक शाळा, दादर मुंबई
५) वेस्टर्न रेल्वे जिमखाना हॉल, सेनापती बापट मार्ग, महालक्ष्मी स्पोर्टस ग्राऊंड वरळी
६) एन. एम. जोशी रोड महापालिका प्राथमिक शाळा नं 2, लोअर परेल मोनोरेल स्टेशन जवळ एन. एम. जोशी मार्ग, करी रोड, मुंबई
७) रिचर्डसन्स ॲन्ड क्रुडास कंपनी लिमिटेड, तळमजला हॉल, सर जे.जे. रोड, हुमे माध्यमिक शाळेजवळ भायखळा, मुंबई
८) विल्सन कॉलेज तळमजला,रुम नं 102 व रुम नं 104, नेताजी सुभाषचंद्र रोड, गिरगाव चौपाटी, चर्नी रोड, मुंबई
९) तळ मजला गिल्डर लेन महानगर पालिका शाळा, मुंबई सेंट्रल स्टेशनसमोर, मुंबई सेंट्रल पुर्व, मुंबई
१०) न्यु अपलाईड आर्ट असेंबली हॉल (एक्झिबिशन हॉल) सर जे. जे. स्कूल ऑफ अपलाईड आर्ट, डॉ. डी. एन. रोड फोर्ट, मुंबई या दहा ठिकाणी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे.
०००
The post मतमोजणी केंद्रावर पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा -जिल्हाधिकारी संजय यादव first appeared on महासंवाद.