कापूस-सोयाबीन अनुदान योजनेतून ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २३९८ कोटी रुपये वितरित

मुंबई, दि. ३० : गतवर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती. अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित  पवार तसेच कृषीमंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळ बैठकीतून करण्यात आली. याद्वारे एका क्लिकवर सुमारे ४९ लाख ५०हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी ५ हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत २३९८ कोटी ९३ लक्ष रुपये रक्कम वर्ग करण्यात आले.

2023 च्या खरीप हंगामात एकूण 96 लाख 787 सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने एकूण 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे. त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीनसाठी 2646 कोटी  34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

अनुदान स्वतंत्ररित्या वितरण करण्यासाठी लेखाशीर्षासह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले होते. पारदर्शक पद्धतीने कार्यवाही करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमती पत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आली. आज जवळपास 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ दिला आहे. आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तसं तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

०००

दत्तात्रय कोकरे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *