नंदुरबार, दि. १४ (जिमाका वृत्त): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या चार विधानसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली आज (14 नोव्हेंबर) गृह मतदानाला उत्साहात सुरूवात झाली. उल्लेखनीय बाब म्हणजे आज नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील रजाळे येथील 101 वर्षे वयाच्या आजी श्रीमती उमताबाई गिरासे यांनी अतिशय उत्साहात आपल्या घरून मतदानाचा हक्क बजावला.
जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री अनय नावंदर (अक्कलकुवा), सुभाष दळवी (शहादा), श्रीमती अंजली शर्मा (नंदुरबार), महेंद्र चौधरी (नवापूर) यांच्या यांच्या नेतृत्वाखाली नियुक्त 48 पथकांमार्फत हे मतदान सलग चार दिवस दोन फेरीत रविवार 17 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे.
गृह मतदानाची पहिल्या फेरीची भेट 14 व 15 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे. पहिल्या फेरीत मतदार न भेटल्यास द्वितीय भेटीची फेरी 16 व 17 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग यांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 12 डी फॉर्म भरून घेतला आहे. या फॉर्मची तपासणी केल्यानंतर जिल्ह्यातील 1 हजार 164 मतदार गृहमतदानासाठी पात्र ठरले आहेत. 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांमध्ये अक्कलकुवा-221, शहादा-257, नंदुरबार-383, नवापूर-285 असे एकूण 1 हजार 164 ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदार मतदान करणार आहेत.
गृहमतदानासाठी विधानसभाक्षेत्रात नियुक्त 48 पथके गृह मतदानाची नोंदणी केलेल्या मतदारांच्या घरी जाऊन पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करून घेत आहेत. गृहमतदानाची प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने करण्यात येणार आहे. मतदारांनी लेखी मागणी केल्यास त्यांना मदतनीसाची मदत घेता येईल. मात्र एका मदतनीसाला केवळ एका मतदाराला मदत करता येणार आहे. गृहमतदानाच्या प्रक्रियेचे निरीक्षक करावयाचे असल्यास राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहता येणार आहे.
०००
The post नंदुरबार जिल्ह्यात गृह मतदानाला उत्साहात सुरूवात first appeared on महासंवाद.