नंदुरबार, दि. १३ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम असलेल्या 5 मतदान केंद्रांची मतदानाची वेळ 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 अशी निश्चित केली असल्याचे असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
अक्कलकुवा (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील नर्मदा काठावरील अतिदुर्गम (बार्जने जाणारे) मणीबेली, चिमलखेडी, बामणी, डनेल व मुखडी ही 5 मतदान केंद्रे अत्यंत दुर्गम भागात असून सातपुडा पर्वत रांगेत नर्मदा काठावर वसलेले आहेत. या मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी प्रथम रस्ते मार्ग, नंतर बोटीतून प्रवास करावा लागतो व त्यासाठी वेळही जास्त लागतो. तसेच मतदानानंतर मतदान केंद्रांवरुन परत येतांना देखील तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे या मतदान केंद्रावर मतदान सकाळी 07.00 ते दुपारी 03.00 वाजेपर्यंत होणार आहे, यासाठी भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे, असेही डॉ. सेठी यांनी नमूद केले आहे.
सकाळी ७.०० ते दुपारी ३.०० या वेळेत होणाऱ्या या अतिदुर्गम मतदान केंद्रात मतदान केंद्र क्रमांक १ चे मणीबेली (मतदार संख्या ३५५), मतदान केंद्र क्रमांक ७ चिमलखेडी (मतदार संख्या ४८०), मतदान केंद्र क्रमांक १० बामणी (मतदार संख्या ८२४), मतदान केंद्र क्रमांक १२ डनेल (मतदार संख्या ८६५), मतदान केंद्र क्रमांक १३ मुखडी (मतदार संख्या २९१) अशा एकूण पाच अतिदुर्गम मतदान केंद्रांवरील २ हजार ८१५ मतदारांना सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान करावे लागणार आहे. या बदलाबाबत सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सेठी यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
०००
The post अक्कलकुवा मतदारसंघात ५ अतिदुर्गम मतदान केंद्रांवर सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत मतदान -डॉ. मित्ताली सेठी first appeared on महासंवाद.