निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा

विधानसभा निवडणूक २०२४

मुंबई, दि.३१ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात केंद्रीय निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी भेट देऊन निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा घेतला.

२०१९ च्या विधानसभा व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिकाधिक मतदान होणे हे भारत निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. जनजागृतीद्वारे मतदानाचा टक्का वाढवणे यासाठी विविध संस्था, प्रसिद्ध व्यक्ती, स्थानिक कलाकार आणि यू-ट्यूबर्सच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्याबाबत श्री. बाली यांनी सूचना दिल्या.

या बैठकीत १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी-ठाकूर यांनी सादरीकरण केले. बैठकीला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहलता स्वामी, सहायक आयुक्त के/पश्चिम विभागाचे श्री. चक्रपाणी आल्ले, सहायक पोलिस आयुक्त मुगूटराव आणि कल्पना गाडेकर यांच्यासह अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी पूजा सुखटणकर, अजय भोंडवे व इतर निवडणूक अधिकारी उपस्थित होते.

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. हा निवडणूक उत्सव मतदानाचा टक्का वाढवून साजरा करूयात, असा आशावाद केंद्रीय निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी व्यक्त केला. तसेच, त्यांनी श्री. ना. दा. ठा. महिला विद्यापीठ, जुहू संकुल येथील १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील स्ट्राँग रुमला भेट देऊन विविध कक्षातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी चर्चा केली आणि मार्गदर्शन केले.

००००

केशव करंदीकर/विसंअ

The post निवडणूक निरीक्षक नरिंदर सिंग बाली यांनी घेतला १६५- अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *