‘एमटीडीसी’मार्फत जागतिक पर्यटन दिनानिमित्त विविध कार्यक्रम

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे २७ सप्टेंबर रोजी ‘जागतिक पर्यटन दिन २०२४’ साजरा करण्यात येणार आहे. युनायटेड नेशन टुरिझम (UN TOURISM) द्वारे सन २०२४ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवाक्य (Theme) ‘पर्यटन आणि शांतता’ (Tourism & Peace) हे घोषित करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अखत्यारित असलेल्या सर्व प्रादेशिक कार्यालये यांच्यातर्फे ‘पर्यटन व शांतता’ या विषयाच्या अनुषंगाने परिसंवाद, चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी यांनी  दिली आहे.

यावर्षी जॉर्जियाची राजधानी तीबीलीसी येथे २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. जागतिक पर्यटन दिन हा केंद्रिय पर्यटन मंत्रालय, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधत ‘एमटीडीसी’ची प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासे, उपहारगृहे, बोट क्लब्स, कलाग्राम इ. ठिकाणी २७ सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्यटनाशी निगडीत विविध उपक्रमांची अंमलबजावणी करत ‘पर्यटन दिन’ साजरा  करण्यात येणार आहे.

एमटीडीसी प्रादेशिक कार्यालयांमार्फत परिसंवाद आयोजित केले जाणार आहेत. यामध्ये नामवंत व्यक्ती, पर्यटन तज्ज्ञ व पर्यटन व्यावसायिकांना आमंत्रित केले जाणार आहे. त्याचबरोबर निबंध स्पर्धांचे प्रत्येक प्रादेशिक स्तरावर आयोजन करण्यात येणार आहे. निबंध स्पर्धेसाठी  पर्यटन : शांतता स्थापित करण्याचे एक साधन, पर्यटन व जागतिक शांतता, महाराष्ट्राची पर्यटन स्थळे व त्यांचा शांतता संदेश, माझ्या स्वप्नातले पर्यटन, भारत व पर्यटन : शांततेचे दूत आणि प्रतिक असे विषय  ठेवण्यात आले आहेत. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘पर्यटन व शातंता’ या घोषवाक्याशी निगडीत प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा  देखील आयोजित करण्यात येणार आहे.

निबंध आणि चित्रकला स्पर्धेतील प्रथम पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात दोन व्यक्तींना २ रात्री ३ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह. (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितील पर्यटक निवासात), व्दितीय पारितोषिक विजेत्याला पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ रात्र २ दिवस राहण्याची व्यवस्था + प्रमाणपत्र + स्मृतीचिन्ह (संबंधित प्रादेशिक व्यवस्थापकांच्या अखत्यारितीतील पर्यटक निवासांत), तृतीय पारितोषिक विजेत्याला जवळच्या पर्यटक निवासात २ व्यक्तींना १ दिवस राहण्याची व्यवस्था दुपारचे जेवण प्रमाणपत्र+ स्मृतीचिन्ह अशी पारितोषिक ठेवण्यात आली आहेत. पर्यटक निवासांमध्ये माहितीपत्रकांचे प्रकाशन करणे. पर्यटक निवासांत वास्तव्यास आलेल्या पर्यटकांकरिता अनुभवात्मक पर्यटनाची सांगड घालून, पर्यटक निवासी वास्तव्यास आलेले अतिथी पर्यटकांना नजिकच्या सुरक्षित- पर्यावरणपूरक ठिकाणी ट्रेक, जंगल ट्रेल, नेचर वॉकचे आयोजन करावे जागतिक पर्यटन दिनाचे उपक्रम प्रभावीप्रणे राबवावे असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सूर्यवंशी यांनी केले आहे.

एमटीडीसीच्या  पर्यटन दिनानिमित्त राज्यभर होत असलेल्या प्रादेशिक कार्यालयातील विविध कार्यक्रम, परिसंवाद, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा, अनुभवात्मक पर्यटनाची नोंद जागतिक पर्यटन संघटना युनायटेड नेशन्सने घेतली असून  ही  माहिती युनायटेड नेशन्सच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

या स्पर्धेसाठी एमटीडीसीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल, राज्यातील प्रत्येक प्रादेशिक व्यवस्थापक, मानसी कोठारे हे कार्यरत आहेत.

**

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *