आत्मविश्वास आणि कठोर परिश्रमाच्या बळावर जीवनात यश संपादन करा – राज्यपाल

अहमदनगर दि.१९ – जीवनात अनेक समस्यांना सामोरे जाताना न डगमगता आत्मविश्वास, कठोर परिश्रम आणि पूर्ण क्षमतेने कार्य केल्यास यश संपादन करता येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

लोणी बु. येथील प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाच्या १८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पद्मश्री सावजी ढोलकीया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ.व्ही.एन.मगरे, संस्थेचे विश्वस्त सुवर्णा विखे पाटील, मोनिका सावंत, ध्रुव विखे पाटील, कुलसचिव डॉ. अरुण कुमार व्यास आदी उपस्थित होते.

स्नातकांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन राज्यपाल म्हणाले, अनेक महापुरुषांच्या जीवनात आव्हानाचे प्रसंग आलेत, त्यांनी आत्मविश्वासाने त्यावर मात करून उद्दिष्ट गाठले. स्नातकांनी सेवा भावनेने कार्य करताना स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नये. आपल्या यशासाठी आई-वडिलांनी परिश्रम घेतले आहेत हे न विसरता त्यांच्याविषयी कायम श्रद्धा मनात बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले.

श्री.राधाकृष्णन पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात सामाजिक बांधिलकी आणि समर्पित कार्याच्या बळावर प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठासारखी संस्था उभी राहू शकते हे संस्थेसाठी झटणाऱ्या स्व.विठ्ठलराव विखे पाटील आणि स्व.बाळासाहेब विखे पाटील यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्याचे विद्यापीठाचे कार्य इतरांना मार्गदर्शक आहे.

वर्षभरात दहा लाख नागरिकांना उपचार देण्याचे संस्थेचे कार्यदेखील उल्लेखनीय आहे. सामान्य कुटुंबीयातून आलेल्या विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यापीठात देण्यात येते. सेवाभावनेने काम करणारे डॉक्टर्स येथून तयार होतात. विद्यापीठाने रुग्णावर उपचार करण्यासाठी बहुशाखीय दृष्टिकोन स्वीकारला आहे आणि अवयव प्रत्यारोपणसारख्या सुविधा इथे उभारण्यात येत आहेत. संस्थेची प्रगती खरोखर कौतुकास्पद असल्याचे राज्यपाल म्हणाले.

सामाजिक बांधिलकीतून आरोग्य सेवा देण्याचे कार्य- मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, प्रवरा आरोग्य विद्यापीठाच्या माध्यमातून सेवा कार्य सुरू आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा देण्याचे कार्य केले. त्यांची प्रेरणा घेऊन विद्यापीठाचे कार्य सुरू असून सामाजिक बांधिलकीने समाजाच्या प्रत्येक घटकाला सेवा देण्याचे कार्य होत आहे. समर्पण, सामाजिक उत्तरदायित्व, सेवा कार्याची परंपरा प्रवरा आरोग्य विद्यापीठ पुढे नेत आहे, असे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रात काम करतांना विद्यार्थ्यांनी नवीन संशोधनावर भर देऊन त्याचा समाजासाठी उपयोग करावा असे विद्यार्थ्यांना आवाहन करून  श्री.विखे पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पद्मश्री सावजी ढोलकिया यांनी सामाजिक क्षेत्रात मोलाची कामगिरी केल्याचेही ते म्हणाले.

पद्मश्री ढोलकीया म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मोठे यश संपादन करू शकतात. विद्यार्थ्यांनी आपण सर्वोत्तम असल्याचा आत्मविश्वास बाळगावा. मी कोणत्याही परिस्थितीत उद्दिष्ट गाठू शकतो, ईश्वर चांगले प्रयत्न करणाऱ्याच्या सोबत असतो, मी विजेता आहे हा विचार मनाशी बाळगा.  मागचे अपयश विसरून वर्तमानात विजेत्याचा आत्मविश्वास बाळगून काम करा. नशिबावर अवलंबून न राहता विश्वासाने काम केल्यास यश संपादन करता येते. सेवा ही सर्वोत्तम गुंतवणूक असून त्याआधारे सर्वोत्तम यश मिळविता येईल, असा प्रेरक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मिळालेला सन्मान जबाबदारी म्हणून स्वीकारत असून अधिक चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील म्हणाले, ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना आरोग्य  सुविधा देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यासाठी अशा भागात सेवा देणारे कुशल वैद्यकीय अधिकारी घडविण्याचे कार्य विद्यापीठ करीत आहे.

कुलगुरू मगरे यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.

राज्यपाल श्री.राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रवरा विशेषोपचार रुग्णालय आणि अवयव प्रत्यारोपण केंद्राचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. त्यांच्या हस्ते पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मश्री सावजी ढोलकीया यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ या मानद उपाधीने सन्मानित करण्यात आले. पदवीदान समारंभात ९ स्नातकांना पीएच.डी.पदवी प्रदान करण्यात आली, तर विशेष गुणवत्ता प्राप्त १३ स्नातकांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. ९४९  पदवी आणि पदव्युत्तर स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात दीक्षान्त संचलनाने झाली.

कार्यक्रमाला कार्यकारी परिषदेचे सदस्य, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *