दुचाकी वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन मालिका सुरु होणार – अर्ज करण्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

मुंबई, दि.12 : प्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरीवली या कार्यालयांतर्गत नवीन दुचाकी वाहन प्रकाराची एम. एच 47 बी डब्ल्यू ही नोंदणी क्रमांकाची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी आकर्षक क्रमांक, पसंती क्रमांकासाठी विहीत नमुन्यातील अर्ज 13 सप्टेंबर 2024 पासून सुरू करण्यात येत असून 19 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत स्वीकारण्यात  येणार आहे. त्यानंतर प्राप्त अर्जांचे शुल्क स्वीकारण्याचे कामकाज सुरू करण्यात येईल. 

आकर्षक अथवा पसंती क्रमांक घेण्यास इच्छुक असलेल्या अर्जदारास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर क्रमांक देण्यात येणार आहे. मालिका सुरू होण्याच्या दिनांकास सकाळी 11 वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास आकर्षक क्रमांकासाठी विहित पद्धतीनुसार लिलाव करण्यात येईल. त्यानुसार एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सर्व अर्जदार मालिका सुरू होण्याच्या दिनांकाच्या दिवशी संबंधित क्रमांकासाठी असलेल्या मूळ रक्कमेचा धनाकर्ष संबंधित रोखपाल यांना सादर करतील. त्याच दिवशी 19 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत लिलाव बोलीच्या रकमेचा धनाकर्ष बंद पाकिटात संबंधित रोखपालाकडे सादर करावा लागणार आहे. या बंद पाकिटातील धनाकर्ष नोंदणी प्राधिकाऱ्यांसमोर उघडले जाऊन सर्वात जास्त रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदारास आकर्षक अथवा पसंती क्रमाक देण्यात येईल. अर्जदाराने 19 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत बोली रकमेचा बंद पाकिटातील धनाकर्ष जमा केला नाही, तर सदर क्रमांक दुसऱ्या अर्जदारास देण्यात येईल, असे बोरीवलीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम कासार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

००००

निलेश तायडे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *