गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी दक्ष राहावे; पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

जिल्ह्यातील गणेशोत्सवाचा पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

ठाणे, दि.30 (जिमाका):- ठाणे जिल्ह्यात लागोपाठ येणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुका व ईद-ए-मिलादच्या मिरवणुका शांततेत संपन्न व्हाव्यात, यासाठी पोलीस, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने दक्ष राहण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिल्या तर नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद च्या मिरवणुकीसंदर्भात जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित जिल्हा प्रशासन, पोलीस व महानगरपालिका प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी आमदार गीता जैन, राजू पाटील, शांताराम मोरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.इंदूराणी जाखड, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त डॉ.प्रशांत रोडे, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, तिरूपती काकडे, रश्मी नांदेडकर, मीना मकवाना, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप माने, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी गोपीनाथ ठोंबरे, तहसिलदार डॉ.आसावरी संसारे, रेवण लेंबे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्त, मनुष्यबळाची उपलब्धता, कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या उपाययोजना, विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, विसर्जनस्थळाच्या सुविधा याबद्दल सर्व पोलीस आयुक्तालये व महापालिकांकडून सविस्तर माहिती घेतली.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.देसाई म्हणाले की, महानगरपालिका व नगरपरिषद हद्दीतील रस्त्याचे खड्डे 100 टक्के भरण्यात यावे. पाऊस कमी झाला आहे, नालेसफाई तात्काळ करुन घ्यावी. नाले जर अगोदर तुंबले असतील तर पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यासाठी आवश्यक तेथे नाल्यांची स्वच्छता करून घ्यावी. 24 तास विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत विभागाने दुरूस्तीची कामे तात्काळ पूर्ण करुन घ्यावीत.

ते पुढे म्हणाले की, मोठ्या गणेशोत्सवामध्ये गर्दीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवावा. महिलांची छेडछाड होणार नाही याची दक्षता घ्यावी. श्रींच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणूकीच्या वेळी वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मिरवणूका शांततेत पार पडायला हव्यात. विसर्जनाच्या ठिकाणी वॉर्ड अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. कृत्रिम तलावामध्ये पुरेसा पाणीसाठा ठेवावा. जेणेकरुन मूर्ती विसर्जन व्यवस्थित होईल, मूर्तीची विटंबना होणार नाही याची पूरेपूर काळजी घ्यावी.

पोलिसांनी गस्तीचे प्रमाण वाढवावे. गणेशोत्सव काळात एकही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्यावी. लेझर लाईटचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, त्यामुळे या लेझर लाईटबाबत आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. विसर्जनाच्या मिरवणूकीमध्ये आवाजाची मर्यादा मोडली जाते, प्रकृतीला इजा होईल अशा प्रकारे आवाजाचा डेसिबल वाढू नये, याची दक्षता घ्यावी, असे सांगून उत्सवात कोणतीही आडकाठी आणू नये. सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घ्यावी. महिला, बालके यांच्यासह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी, असेही श्री.देसाई यांनी यावेळी सांगितले.

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील उत्सव कालावधीत मांस विक्रीबाबतचा निर्णय स्थानिक पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक संघटना यांनी एकत्रित समन्वयाने घ्यावा. याचे नियोजन व नियंत्रण मिरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तांनी करावे, अशा सूचना श्री.देसाई यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी पालकमंत्र्यांना सांगितले की, गणेशोत्सवासंदर्भात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका आयुक्त व सर्व यंत्रणांची बैठक घेवून सर्व संबंधितांना आवश्यक त्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन तहसिलदार डॉ.आसावरी संसारे यांनी केले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *